लसीकरणाला प्रतिसाद वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:07 AM2021-04-02T04:07:59+5:302021-04-02T04:07:59+5:30
४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ८६ केंद्रांवर व्यवस्था लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार गुरुवारी ४५ ...
४५ वर्षांवरील नागरिकांसाठी ८६ केंद्रांवर व्यवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या दिशानिर्देशानुसार गुरुवारी ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी शहरातील शासकीय व खासगी अशा ८६ केंद्रांवर नागरिकांचा प्रतिसाद होता. दररोज सात ते आठ हजार नागरिकांना लस दिली जात आहे. पुढील काही दिवसात हा आकडा १८ ते २० हजारापर्यंत नेण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
शहरामध्ये ४६ खासगी व ४० शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसह मनपा कर्मचारी, पोलीस, उपद्रव शोध पथक, सफाई कर्मचारी, महसूल विभाग, रेल्वे, बँक, बीएसएनएल, डाक, भारतीय खाद्य महामंडळ, विद्युत विभाग, शिक्षक, एलपीजी कर्मचारी, इन्सिडेंट कमांडर आदींनी लसीकरणाला प्रतिसाद दिला. महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नियमाच्या पालनासह लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले आहे.
डॉ. सूर्यकांत गजभिये यांनी लसीकरणाचा कुठलाही त्रास होत नाही. लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे सांगितले. ४५ वर्षांवरील प्रत्येकाने कोविड लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
मिलिंद पांडे यांनी लसीकरण केंद्रावर असलेले व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. सुलोचना महल्ले यांनी ४५ वर्षांवरील वयोगटातून आपण लस घेतली असून, इतर सर्व पात्र लाभार्थ्यांनीही लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. चंद्रशेखर पेशकार व केतकी पेशकार यांनी लसीकरणासाठी चांगली व्यवस्था असल्याचे सांगितले.
‘फ्रंटलाईन वर्कर्स’ म्हणून लस घेतलल्या बँक कर्मचारी भाविका चोटवानी यांनी लसीकरणाचा लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आज बँकर्ससह इतर कर्मचाऱ्यांसाठी फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून लसीकरणाला सुरुवात झाली असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी पुढे यावे. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करताना अनेकदा आपण कुणाच्या संपर्कात येतो, हे लक्षात येत नाही. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने लस घ्यावी, असे त्या म्हणाल्या. बँक कर्मचारी मोहित अरोरा व शिरीष जोशी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना लस मिळत असल्याने समाधान व्यक्त केले.