लहान मुलांमध्ये डिप्रेशनचा धोका वाढलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 10:39 PM2018-11-14T22:39:59+5:302018-11-14T22:42:42+5:30

क्रिश या अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे समाजमन ढवळून निघाले असून आधुनिक तंत्रज्ञान व जीवनशैलीमुळे बदलणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. १३-१४ वर्षाच्या मुलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे ही धोक्याची घंटा असून पालकांनी सावधानता बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. लहान मुलांना डिप्रेशन (नैराश्य) येत नाही, हा समज खोटा असून पालकांनी मुलांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.

Increased risk of depression among children | लहान मुलांमध्ये डिप्रेशनचा धोका वाढलाय

लहान मुलांमध्ये डिप्रेशनचा धोका वाढलाय

Next
ठळक मुद्देनागपुरातील क्रिशच्या आत्महत्येमुळे प्रश्न : पालकांनो मुलांच्या वर्तणुकीतील फरक ओळखा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रिश या अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे समाजमन ढवळून निघाले असून आधुनिक तंत्रज्ञान व जीवनशैलीमुळे बदलणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. १३-१४ वर्षाच्या मुलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे ही धोक्याची घंटा असून पालकांनी सावधानता बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. लहान मुलांना डिप्रेशन (नैराश्य) येत नाही, हा समज खोटा असून पालकांनी मुलांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.
याबाबत लोकमतने शहरातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांच्याशी संवाद साधून नेमक्या कारणांची मीमांसा केली आहे. क्रिशची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्या बाबतीत नेमके काय घडले, याबाबत माहीत नसल्याने त्याच्या आत्महत्येमागे काय कारण आहे ते नेमके सांगता येणार नाही. मात्र मुलांमध्ये वाढलेल्या नैराश्याचा आणि इंटरनेट सुविधेसह असलेला मोबाईल, संगणक व टीव्ही स्क्रिन अ‍ॅडीक्शनचा धोका पालकांनी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

मुलांमध्ये बालनैराश्याची शक्यता
साधारणत: ४० ते ५० वर्षापूर्वी मुलांमध्ये नैराश्य येत नाही असे समजले जायचे. मात्र आज हा समज पूर्णपणे खोटा ठरणारा आहे. ज्याप्रमाणे २० ते २५ वर्षाच्या तरुणांपासून ६० ते ७० वर्षाच्या ज्येष्ठांना नैराश्याचा आजार होण्याची शक्यता आहे, त्याप्रमाणे १२ ते १५ वर्षाच्या मुलांना बालनैराश्य (चाईल्ड डिप्रेशन)चा आजार होण्याची शक्यता आहे. किंबहुना गेल्या काही वर्षात हे प्रमाण जगभरात वाढले असून सर्वेक्षणाने ते सिद्धही झाले आहे. भारतातही हा धोका वाढला आहे. मुलांची लक्षणे प्रौढांपेक्षा वेगळी असतात. मोठी माणसे कदाचित सांगूही शकतील, पण मुले त्यांचा त्रास शब्दात व्यक्त करू शकत नाही. मात्र त्यांच्या रोजच्या दिनचर्येतून आणि वर्तणुकीतील बदलातून हा त्रास सहज लक्षात येऊ शकणारा असल्याचे डॉ. अविनाश जोशी यांनी स्पष्ट केले.

कारणे आणि इतर गोष्टी
घरात आईवडिलांमध्ये होणारी भांडणे किंवा घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या मानसिकेतवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय परिसरात किंवा शाळेत मुलांनी सामूहिकपणे टार्गेट केल्यास किंवा चिडविल्यास नैराश्य येण्याची शक्यता असते. याची अनुवांशिक कारणेही असू शकतात. मोबाईल, टीव्ही स्क्रिनचे व्यसनही धोकादायक ठरणारे असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

मुलांचे नैराश्य कसे ओळखावे?
मुलांच्या रोजच्या दिनचर्येतून व वर्तणुकीतून हा त्रास लक्षात येऊ शकतो. मुलांमध्ये अचानक चिडचिड वाढणे, हट्टीपणा, जेवणाच्या वेळा न सांभाळणे, झोपेचा त्रास, अभ्यास आणि शाळेकडे लक्ष नसणे, एकलकोंडेपणा वाढणे यासारखा फरक जाणवला की काहीतरी समस्या आहे, ही बाब पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. हे एका दिवसात होत नाही तर महिने-दोन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून त्यांचा त्रास असण्याची शक्यता आहे.

१०० टक्के दूर करता येते नैराश्य
गैरसमज आणि माहितीच्या अभावामुळे पालक मुलांमध्ये घडणाऱ्या बदलाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मात्र त्यांच्या वर्तणुकीत थोडासा जरी फरक जाणवला तर पालकांनी याची गंभीरता ओळखणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांसोबत मानसोपचार तज्ज्ञांशी भेट घ्यावी. निदान जवळच्या बालरोगतज्ज्ञाचा तरी सल्ला घेणे आवश्यक आहे. यावर कौन्सिलिंग व औषधोपचार करून नैराश्यातून बाहेर काढता येते. सल्ल्यानुसार घरचे निराशाजनक वातावरण बदलल्यास मुलांना सकारात्मक करणे शक्य होते. यासाठी मुलांच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Increased risk of depression among children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.