नागपुरात उष्माघाताचा वाढला धोका! तापमान ४३ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 09:24 PM2022-04-12T21:24:01+5:302022-04-12T21:24:26+5:30
Nagpur News सध्या नागपूर शहरातील तापमान ४३ अंशांच्या दरम्यान असल्यामुळे उष्माघाताचा धोका जास्त संभवतो. यामुळे लहान मुले व वृद्धांकडे लक्ष द्या, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागपूर : तापमानात सातत्याने वाढ होऊन मंगळवारी ४३ अंशांवर पोहोचल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मे महिन्यातील तापमानाची तीव्रता एप्रिल महिन्यात दिसून येऊ लागली आहे. याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यास शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडते आणि उष्माघात होतो. चक्कर, डोकेदुखी, मळमळ-उलटी, पोटात वेदना, गोंधळलेली अवस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास जिवाला धोका होतो. सध्या नागपूर शहरातील तापमान ४३ अंशांच्या दरम्यान असल्यामुळे उष्माघाताचा धोका जास्त संभवतो. यामुळे नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघण्याचे टाळावे. भरपूर पाणी प्यावे, सैल कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा टोपीचा वापर करावा. प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करताना कापडाने डोके, मान, चेहरा झाकावा. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक, आदी पेय नियमित प्यायला हवे. घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कूलर, आदींचा वापर करा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी केले.
-लहान मुले, वृद्धांकडे लक्ष द्या!
उष्माघात कोणालाही होऊ शकतो. परंतु, चार वर्षांपेक्षा छोट्या मुलांना आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना हा आजार धोकादायक ठरू शकतो. कारण, छोट्या मुलांमध्ये शरीराचे तापमान सामान्य करण्याची क्षमता विकसित झालेली नसते, तर ज्येष्ठांमध्ये औषधे आणि विविध आजारांमुळे उष्णता सहन करण्याची आणि शरीराला त्यानुरूप तयार करण्याची प्रक्रिया कमजोर पडलेली असते. यामुळे लहान मुले व वृद्धांकडे लक्ष द्या, असे आवाहन मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बहिरवार व सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी केले.