सिकलसेल रुग्णांमध्ये वाढला अवेळी मृत्यूचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:43+5:302021-09-04T04:11:43+5:30
नागपूर : राज्यात सिकलसेलचे सर्वाधिक रुग्ण विदर्भात आढळून येतात. यात एकट्या नागपुरातील मेडिकलमध्ये जवळपास पाच हजार रुग्णांची नोंद आहे. ...
नागपूर : राज्यात सिकलसेलचे सर्वाधिक रुग्ण विदर्भात आढळून येतात. यात एकट्या नागपुरातील मेडिकलमध्ये जवळपास पाच हजार रुग्णांची नोंद आहे. यातील साधारण दोन हजार रुग्ण नियमित उपचारासाठी येतात. परंतु या रुग्णांसाठी जीवनदायी असलेली ‘हायड्रोक्सीयुरिया’ औषधीच महिनाभरापासून नसल्याने अवेळी मृत्यूचा धोका वाढला आहे.
सिकलसेल हा रक्ताशी निगडित आजार आहे. यावर ‘बोनमॅरो’ प्रत्यारोपण एकमेव उपचार आहे. जेवढ्या कमी वयात म्हणजे ८ ते १६ या वयोगटात प्रत्यारोपण झाल्यास याचे निकाल चांगले मिळतात. परंतु हा महागडा उपचार असल्याने बहुसंख्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. यामुळे देशातील जवळपास १४ लाख रुग्ण ‘हायड्रोक्सीयुरिया’ या औषधांवर अवलंबून आहेत. सिकलसेलबाधितांना सतत उठणारे दुखणे व रक्ताच्या कमतरतेच्या समस्यांवर ही औषधी प्रभावी असल्याने ती जीवनदायी आहे. परंतु शासकीय रुग्णालयात तेही मिळणे आता कठीण झाले आहे. मेडिकलमध्ये महिनाभरापासून हे औषध नसल्याने रुग्णांवर पदरमोड करून औषधी विकत घेण्याची वेळ आली आहे. काहींना विकत घेणे शक्य नसल्याने त्यांच्यामध्ये गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
-दोन महिन्यात १० ते १५ सिकलसेलबाधितांचा मृत्यू
सिकलसेलच्या रुग्णांसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याने सांगितले, शासकीय रुग्णालयात ‘हायड्रोक्सीयुरिया’औषधींचा तुटवडा पडला आहे. या औषधांच्या अभावाने रुग्णांमध्ये अवयव निकामी होण्याची जोखीम वाढली आहे. धक्कादायक म्हणजे जुलै व ऑगस्ट या महिन्यात मेडिकलमध्ये १० ते १५ सिकलसेल युवकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारस्तरावर याची चौकशी होणे गरजेचे आहे.
-मेयोमध्ये आठवडाभराची औषधी
‘हायड्रोक्सीयुरिया’च्या १० कॅप्सूलची किंमत ६० रुपये आहे. मेयोमध्ये केवळ बुधवारीच सात दिवसासाठी तर इतर दिवशी केवळ तीन दिवसासाठी ही औषधी मिळते. या अजब निर्णयामुळे सिकलसेलचे रुग्ण अडचणीत आले आहेत. अनेक रुग्णांना मजुरी पाडून ये-जा करण्यातच १०० ते २०० रुपये लागत असल्याने, मेयो रुग्णालयातून औषधी घेण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे वास्तव आहे.
-केवळ जिल्हा रुग्णालयातच औषधी
विदर्भातील जिल्हा रुग्णालयातच ‘हायड्रोक्सीयुरिया’ औषधी मिळते, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रात या औषधी मिळत नाही. यामुळे गावखेड्यातून रुग्णांना जिल्हा रुग्णालयात यावे लागत असल्याने रुग्णांच्या अडचणीही वाढल्या आहेत.
-पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार
मेडिकलमध्ये महिनाभरापासून ‘हायड्रोक्सीयुरिया’ औषधी नाही. यासंदर्भात अधिष्ठात्यांना निवेदन दिले. परंतु आठवडा होऊनही औषधी उपलब्ध झाल्या नाहीत. मेयोमध्येही याचा तुटवडा पडला आहे. सिकलसेलबाधित रुग्णांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबविण्यासाठी आता पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून दाद मागणार आहे.
-जया रामटेके, कार्यकारी अध्यक्ष सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया