इम्युनिटी बूस्टर औषधांचे साईड इफेक्ट वाढले; डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 09:11 AM2020-09-15T09:11:57+5:302020-09-15T09:12:22+5:30
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्वत्र आवश्यक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सोशल मीडिया व व्हॉट्सअॅपवर तर हाच काढा किंवा हीच औषधे परिणामकारक असल्याचा दावा केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, विषाणूचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या कहराची भीती घराघरात आहे. रोगप्रतिकार शक्ती मजबूत असेल तर आपल्याला कोरोना होत नाही किंवा झाला तरी तो लवकर बरा होऊ शकतो, असा काहीसा समज सर्वसामान्यांमध्ये आहे. याचा फायदा घेत काही कंपन्यांनी आयुर्वेदिक व अॅलोपॅथी औषधे बाजारात आाणली आहेत. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधे घेणाऱ्यांना त्रासदायक साईड इफेक्टला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्वत्र आवश्यक उपाययोजनांवर भर दिला जात आहे. सोशल मीडिया व व्हॉट्सअॅपवर तर हाच काढा किंवा हीच औषधे परिणामकारक असल्याचा दावा केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते, विषाणूचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती सर्व प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक आहे. परंतु त्यांसोबतच प्रत्येकाने रोगप्रतिकार शक्ती टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी दैनिक आहारात प्रामुख्याने प्रथिनांचा (वनस्पती प्रथिने) उपयोग होणे अतिशय गरजेचे आहे. यामुळे शरीरास ऊर्जा प्रदान होते, शरीराची झीज भरून निघते, विविध रोगांना शरीरास इजा पोहचविण्यास प्रतिबंध करते. परंतु औषधे किंवा काढा घेताना डॉक्टरांचे मार्गदर्शन आवश्यक ठरते. सध्या व्हिटॅमिन सी, झिंक यासारख्या औषधींचा वापर वाढला आहे. परंतु ही औषधी किती प्रमाणात घ्यावीत हे तपासणीनंतरच कळू शकते. प्रत्येकाची उंची, वजन, वयानुसार औषधांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. प्रत्येकाची मेडिकल हिस्ट्रीदेखील वेगवेगळी असते. त्यामुळे एकच औषध तितक्याच प्रमाणात सर्वच व्यक्तींना लागू पडते असे नाही. यासाठी तज्ज्ञांकडून तपासणी करूनच औषधे घ्यायला हवीत.
औषधी घ्यायची की नाही डॉक्टरांना ठरवू द्या
कामामुळे बाहेर पडावे लागते, बाहेर जास्तवेळ थांबून काम करावे लागते, जास्त लोकांशी संपर्क येतो, म्हणून रोगप्रतिकार शक्ती वाढविणाºया औषधांची व काढ्यांची मागणी वाढली आहे. परंतु उष्णता वाढणे, पुरळ येणे, अॅसिडिटीचा त्रास होणे असे साईड इफेक्ट दिसू शकतात. यामुळे आपल्याला कोणते औषधे जास्त परिणामकारक व साईड इफेक्ट न करणारे आहेत, हे पाहणे गरजेचे असते. त्यामुळे कोणते औषध घ्यायचे ते डॉक्टरांना ठरवू देण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
बाजारात मिळणाऱ्या काढ्यांच्या पावडरांचे वैज्ञानिक संशोधन झालेले नसते. काही च्यवनप्राशमध्ये हेवी मेटल्स असतात. यामुळे यकृतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी बाजारात उपलब्ध औषधी घेण्याआधी तपासणी करणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषध विक्रीच्या दुकानातून औषधे घेणे टाळायला हवे. तसेच एखाद्याला दिलेली औषधी दुसऱ्याला देणे अपायकारक ठरू शकते.
-डॉ. सुशांत मेश्राम
प्रमुख, श्वसनरोग विभाग मेडिकल