उपराजधानीत पोलिसांवर वाढते हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:39 AM2019-02-14T11:39:05+5:302019-02-14T11:40:30+5:30

मंगळवारी आणि बुधवारी शहरात तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या. यामुळे शहर पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे.

Increasing attacks on police in Nagpur | उपराजधानीत पोलिसांवर वाढते हल्ले

उपराजधानीत पोलिसांवर वाढते हल्ले

googlenewsNext
ठळक मुद्देहुडकेश्वर, मानकापूर, गणेशपेठमधील घटना पोलीस दलात खळबळ १२ आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मंगळवारी आणि बुधवारी शहरात तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या. यामुळे शहर पोलिसांत एकच खळबळ उडाली आहे. आरोपींनी मारहाण करून पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. यात पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली आहे.
पहिली घटना हुडकेश्वरच्या नरसाळा येथे घडली. दर्शन कॉलनी येथील रहिवासी धीरज रमेश बांगरे (३६) यांची पत्नी भांडण झाल्यामुळे दोन वर्षापासून नरसाळात राहते. धीरज मंगळवारी रात्री सासूरवाडीत गेला. त्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांशी वाद घातला. त्याने पत्नी आणि सासूला मारहाण केली. गोंधळ झाल्यामुळे वस्तीतील नागरिक गोळा झाले. ते मारहाण करू शकतील अशी शंका आल्यामुळे धीरजने आपला भाऊ नीरज बांगरे, त्याची पत्नी वर्षा आणि रजनीला बोलावले. सोबतच धीरजने पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. नियंत्रण कक्षाच्या सूचनेवरून हुडकेश्वरचे पोलीस शिपाई प्रमोद हे घटनास्थळी पोहोचले. त्यांना धीरज गोंधळ घालत असल्याचे समजताच त्यांनी त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे धीरज आणि त्याच्या कुटुंबीयांनी प्रमोदला घेराव घालून मारहाण सुरू केली. प्रमोदच्या सूचनेवरून ठाण्यातील महिला उपनिरीक्षक सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी धीरज आणि त्याच्या कुटुंबीयांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी शांत होण्याऐवजी त्यांच्याशीच वाद घातला. महिला उपनिरीक्षकाचे केस पकडून मारहाण केली. धीरजच्या आईने पोलिसांनाच गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. यामुळे नरसाळात तणाव निर्माण झाला होता. महिला उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोलिसांशी मारहाण करणे, धमकी देणे आणि धीरजच्या पत्नीच्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना मानकापूरच्या फरस गेटजवळ घडली. कोतवालीचे ठाणेदार उमेश बेसरकर झिंगाबाई टाकळीत राहतात. मंगळवारी त्यांची रात्रीची ड्युटी होती. कोतवाली ठाण्याचा शिपाई विकास यादव रात्री ११.३० वाजता पोलीस जीप क्रमांक एम.एच. ३१, डी. झेड-०३८३ मध्ये चालक गौतमसोबत बेसरकर यांना घेण्यासाठी त्यांच्या घरी जात होता. त्यावेळी फरस गेटजवळ गोधनी, सूर्यवंशी ले-आऊट येथील रहिवासी वीरेंद्र दिनेश काळबांडे आपल्या साथीदारांसह गोंधळ घालत होते. रस्त्यावर गोंधळ सुरू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. हे पाहून पोलिसांनी विकास यादव आणि वीरेंद्र काळबांडे याना रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले.
त्यामुळे आरोपी संतापले. त्यांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. आरोपींनी दगड फेकल्यामुळे पोलीस वाहनाचा काच फुटुन गौतम किरकोळ जखमी झाले. आरोपींनी जीपमधील वायरलेस सेट तोडला. यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
विकास यादव यांनी हिमतीने वीरेंद्र काळबांडे यास अटक केली. त्यानंतर वीरेंद्रचे साथीदार हिमांशु ऊर्फ पिन्नी जगदिश कनोजिया (१९) रा. छोटा धोबीपुरा, सदर जॉन्सन ऊर्फ रॉनी मायकल अंथोनी (२१), चेतन जगदीश रामटेके (२३) रा. बेलिशॉप क्वॉर्टर मोतीबाग, हिमांशु चंद्रशेखर मंतापूरवार (२४) गीतानगर, मानकापूर यांना अटक करण्यात आली. तिसरी घटना बुधवारी दुपारी १ वाजता गणेशपेठच्या बसस्थानक परिसरात घडली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आॅटोचालकांनी जामरची कारवाई करणाºया दोन वाहतूक पोलिसांना मारहाण करून जखमी केले. किशोर धपके आणि प्रकाश सोनोने अशी जखमी वाहतूक पोलिसांची नावे आहेत. दोघेही जामर दलात तैनातीस आहेत. त्यांनी आरोपी सोनू कांबळे रा. बेलतरोडी आणि मयुर राजुरकर रा. रामबाग यांच्या आॅटोला जामर लावले. यामुळे दोन्ही आॅटोचालक संतापले. त्यांनी वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. दुपारची वेळ असल्यामुळे नागरिकांची गर्दी होऊन तणाव निर्माण झाला. काही नागरिकांनी या घटनेची आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. घटनेची माहिती मिळताच झोन क्रमांक ३ चे उपायुक्त राहुल माकणीकर, वाहतूक पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपींना अटक केली. जखमी पोलिसांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई करणार : पोलीस आयुक्त
पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनांची पोलीस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी गंभीरतेने दखल घेतली आहे. ते म्हणाले, सर्व घटनातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची पार्श्वभूमी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आधारे त्यांना ‘एमपीडीए’नुसार तुरुंगात पाठविणे, तडिपार किंवा परिसरातून बाहेर करण्याची कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे पोलीस कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. पोलीस नागरिकांच्या मदतीसाठी आहेत. ते नागरिकांचाच भाग आहेत. पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत होते. त्यांच्यावर हल्ला करण्याची घटना गंभीर आहे.

२४ तासात चार घटना
पोलिसांना मारहाण केल्याच्या २४ तासात चार घटना घडल्या आहेत. मंगळवारी दुपारी संविधान चौकात अ‍ॅक्टिव्हावर स्वार मो. मोबिन अन्सारी यांनी वाहतुक पोलीस नीलेश चौधरी (५१) यांच्यावर हल्ला केला. चौधरी यांना मारहाण करून पळून जाणाºया अन्सारी यांना नागरिकांनी पकडून त्याची पिटाई केली होती. या घटनांमुळे पोलिसांमध्ये रोष निर्माण झाला आहे. चारही घटना नागरिकांचा संयम सुटल्यामुळे घडल्या आहेत. पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. अशा वेळी त्यांना मारहाण करणे गंभीर आहे. मानकापूर, हुडकेश्वर आणि गणेशपेठच्या घटनांमधील आरोपी नशेत होते.

Web Title: Increasing attacks on police in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस