महिलांमध्ये वाढतोय मधुमेह
By admin | Published: July 27, 2014 01:27 AM2014-07-27T01:27:54+5:302014-07-27T01:27:54+5:30
गर्भावस्थेत मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी गर्भवतीच्या सुरुवातीलाच प्राथमिक तपासण्या होणे आवश्यक आहे. महिलांमध्ये वाढत्या मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी मधुमेह विशेषतज्ञासोबतच स्त्रीरोग,
डायबेटीज केअर फाऊंडेशन : दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
नागपूर : गर्भावस्थेत मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी गर्भवतीच्या सुरुवातीलाच प्राथमिक तपासण्या होणे आवश्यक आहे. महिलांमध्ये वाढत्या मधुमेहाला दूर ठेवण्यासाठी मधुमेह विशेषतज्ञासोबतच स्त्रीरोग, बालरोग, आहार आणि ‘डायबेटीज एज्युकेटर’ यांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय तंत्रज्ञान व विज्ञान विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी येथे केले.
डायबेटीज केअर फाऊंडेशनच्यावतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन शनिवारी झाले. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्रतज्ज्ञ डॉ. प्रभा भट्टाचार्य, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी उपस्थित होते. प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता प्रास्ताविकेत म्हणाले, गर्भावस्थेत मधुमेहाचा वाढते प्रमाण वैद्यक शास्त्रासमोर चिंतनाचा विषय ठरत आहे. एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के महिला गर्भावस्थेतल्या मधुमेहाचा सामना करतात. त्यापैकी प्रत्येक पाच महिला भविष्यातही ‘टाईप टू’ या प्रकारातल्या मधुमेहाच्या उंबरठ्यावर उभ्या आहेत, असे सांगून त्यांनी दोन दिवसीय परिषदेची माहिती दिली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपले विचार मांडले. संचालन डॉ. चारू बाहेती ,डॉ. सरिता उगेमुगे व कविता गुप्ता यांनी केले तर आभार डॉ. राजेश अटल यांनी मानले.
दिवसभर चाललेल्या परिषदेत डॉ. शैलजा काळे, डॉ. शशांक जोशी, डॉ. उदय थानावाला, डॉ. शिल्पा जोशी, डॉ. समर बॅनजी आदींनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेत देशभरातून ३५० डॉक्टर सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)