शहरात वाढतोय मलेरिया!
By admin | Published: September 13, 2015 02:36 AM2015-09-13T02:36:35+5:302015-09-13T02:36:35+5:30
उपराजधानीत साथरोगाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत डेंग्यूचे २७ रुग्ण आढळून आले आहेत. याच्या तुलनेत मलेरियाचे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत ३० रुग्णांची नोंद : ग्रामीणमध्ये रुग्ण संख्या रोडावली
नागपूर : उपराजधानीत साथरोगाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत डेंग्यूचे २७ रुग्ण आढळून आले आहेत. याच्या तुलनेत मलेरियाचे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आॅगस्ट महिन्यापर्यंत ३० रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारी ते मे २०१५ या कालावधीत सहा जिल्ह्यात ७ हजार २६६ मलेरियाग्रस्तांची नोंद झाली आहे.
ढगाळ वातावरण, थंडी, पाऊस, मध्येच पडणारे कडकडीत ऊन या वातावरणातील बदलामुळे जीवाणू आणि विषाणूंसोबतच डासांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत आहे. शहरात डासांची संख्या वाढण्यामागे व्यवस्थित न झालेली नालेसफाई, जागोजागी साचलेले डबके व अनेकांच्या घरातील सुरू असलेले कुलर हे प्रमुख कारणे ठरत आहेत. मलेरिया आटोक्यात असल्याचा दावा सरकारी यंत्रणेकडून होत असला, तरी विदर्भातील नागपूर शहर-ग्रामीणसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांत मलेरियाचे रुग्ण मोठ्या संख्येत रुग्ण दिसून येत आहे. जानेवारी ते मे या कालावधीत ७ हजार २६६ मलेरिया रुग्णांची नोंद आरोग्य विभागात झाली आहे. यात दोघांचा मृत्यू आहे. ‘एनोफिलिस’ डासांचा प्रकोप वाढल्यामुळे मलेरियाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. एकट्या गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात ६ हजार ४४४ मलेरियाग्रस्त आढळले आहे.
शहरातही या रुग्णांची संख्या वाढत आहे. २०१४ मध्ये मलेरियाचे ४८ रुग्ण आढळून आले होते. या वर्षी जानेवारीमध्ये पाच, फेब्रवारीमध्ये चार, मार्चमध्ये तीन, एप्रिलमध्ये चार, मेमध्ये तीन, जुलैमध्ये सात तर आॅगस्टमध्ये चार, अशी एकूण ३० रुग्णांची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात झाली आहे.
विशेष म्हणजे, सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येतात. यामुळे नागरिकांनी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)