नागपुरात अतुल्य भारतमध्ये अतुल्य कलाकृतींची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 09:28 PM2018-04-02T21:28:38+5:302018-04-02T21:28:47+5:30
नागपुरात नुकताच एक नेत्रदीपक सोहळा आयोजित केला गेला. येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे अतुल्य भारत हे ते आयोजन होते. या सोहळ्यात एक कलाकार होते, मध्यभारतातील टिकमगढचे पन्नालाल सोनी.
अंकिता देशकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपुरात नुकताच एक नेत्रदीपक सोहळा आयोजित केला गेला. येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे अतुल्य भारत हे ते आयोजन होते. या सोहळ्यात देशाच्या विविध प्रांतातून कलावंत सहभागी झाले होते. यातील एक कलाकार होते, मध्यभारतातील टिकमगढचे पन्नालाल सोनी.
मधमाशाच्या पोळ्याच्या मदतीने पितळी शिल्प हे वाचताना जरा कोडं घातल्यासारखं वाटतं. पण ते प्रत्यक्ष जेव्हा आपण पाहतो तेव्हा कलाकाराचे कसब लक्षात आल्यावाचून राहत नाही. यात पोळ्याचे मेण आणि एका झाडाची विशिष्ट चिक्की एकत्र करून त्यात तेल टाकले जाते. या मिश्रणाला मातीने बनवलेल्या साचावर लावले जाते. त्याचे अनेक थर दिले जातात. एकदा साचा तयार झाला की भट्टीमध्ये एका बाजूला पितळ व दुसऱ्या बाजूला साचा गरम केला जातो. थोडीशी जागा त्या साचात सोडलेली असते. एकदा पितळ गरम झाले की त्या जागेतून मेण वाहून जातं आणि ती जागा पितळाने घेऊन त्यातून एक सुबक शिल्प साकारले जाते.
ही कला सोनी यांच्या घरची पिढीजात परंपरा आहे. या कलेला वाचवणं ही काळाची गरज असल्याचे मत ते व्यक्त करतात. त्यांना या कौशल्यासाठी राज्य सरकारने सन्मानित केले आहे.