सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 09:26 AM2024-11-19T09:26:25+5:302024-11-19T09:26:52+5:30

काटोल-नरखेड मतदारसंघातील घटनेवरून शरद पवार यांनी भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Incumbents are moving to lower levels for power ncp Sharad Pawars anger after the attack on anil Deshmukh | सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप

सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप

NCP Sharad Pawar ( Marathi News ) : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर काल दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत अनिल देशमुख गंभीर जखमी झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकावर निशाणा साधला आहे. "मी काही दिवसांपूर्वीच काटोल इथं गेलो होतो. त्याठिकाणी अनिल देशमुख आणि त्यांच्या चिरंजीवांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतोय ते पाहून सत्ताधारी पक्षाचे लोक अस्वस्थ झाल्याचं माझ्या ऐकिवात होतं. हा प्रतिसाद सहन न झाल्याने आता अनिल देशमुख यांच्यावर शारीरिक हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी मी आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार, हा निवडणुकीतूनच झालेला हल्ला आहे," असा आरोप पवार यांनी केला आहे.

काटोल-नरखेड मतदारसंघातील घटनेवरून भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना शरद पवार यांनी म्हटलं आहे की, "काही दिवसांपासून काटोल मतदारसंघात अनिल देशमुख आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय संघर्ष सुरू होता. या संघर्षामुळे देशमुख यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असं आमच्या ऐकिवात होतं. जे ऐकिवात होतं ते प्रत्यक्षात घडलं आहे. सत्ताधारी पक्ष सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे आज स्पष्ट झालं आहे. या हल्ल्याचा मी निषेध करतो," अशा शब्दांत शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांच्याबाबत घडलेली घटना सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला राजकीय स्टंट असू शकतो, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या आरोपाचाही शरद पवार यांनी समाचार घेतला आहे. "डोक्यामध्ये दगड घालून, रक्त सांडवून कोणी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतं का?" असा सवाल पवार यांनी विचारला आहे.

नेमकं काय घडलं?

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात देशमुख यांच्या कपाळाला गंभीर इजा झाली. नरखेड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचाराची सांगता सभा आटोपून देशमुख हे परत येत असताना चार युवक अचानक गाडीसमोर आले. एकाने गाडीच्या काचेवर दगडफेक केली. एक मोठा दगड देशमुख यांच्या कपाळाला लागला. रक्तस्राव झाल्याने त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. जखमेच्या जागेवर सूज आल्याने डॉक्टरांनी त्यांना सीटी स्कॅन करण्याचा सल्ला दिला. देशमुख यांचा रक्तदाबही वाढला होता. येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरच्या खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. 

Web Title: Incumbents are moving to lower levels for power ncp Sharad Pawars anger after the attack on anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.