Independence Day 2018! झेंडा उंचा रहें हमारा ....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 10:33 AM2018-08-16T10:33:08+5:302018-08-16T10:34:06+5:30
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आलेल्या मानाच्या राष्ट्रपती पदकांपैकी ८ शौर्यपदकांसह तब्बल ५१ पदके मिळवून महाराष्ट्राने देशात आपल्या शौर्याचा झेंडा फडकावला आहे.
नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून घोषित करण्यात आलेल्या मानाच्या राष्ट्रपती पदकांपैकी ८ शौर्यपदकांसह तब्बल ५१ पदके मिळवून महाराष्ट्राने देशात आपल्या शौर्याचा झेंडा फडकावला आहे. सर्वाधिक ७७ पदके उत्तर प्रदेशाने मिळवली. मात्र, त्यातील शौर्यपदक केवळ एकच आहे हे येथे उल्लेखनीय.
देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी सेवारत असलेल्या सुरक्षा यंत्रणा तसेच त्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांनी बजावलेल्या अत्युच्च कामगिरीचा आढावा घेत दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध मानाच्या पदकाने सन्मानित केले जाते. अतुल्य शौर्य दाखविणाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपदक (पीपीएमजी), खडतर ठिकाणी शौर्यपूर्ण कामगिरी करणाऱ्यांना शौर्यपदक (पीएमजी), वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावणाऱ्यांना (पीपीएम) आणि गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्यांना (पीएम) हे मानाचे पदक देऊन संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव केला जातो. यावर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यनिहाय आणि दलनिहाय ९४२ पदकं जाहीर करण्यात आली. त्यात २ राष्ट्रपती पोलीस पदकं, १७७ शौर्यपदकं, ८८ वैशिष्ट्यपूर्ण सेवापदकं आणि ६७५ गुणवत्तापूर्ण सेवापदकांचा समावेश आहे.यापैकी सर्वाधिक ७७ पदके उत्तर प्रदेशने मिळवली आहे तर ५१ पदके मिळवून महाराष्ट्रने आपला झेंडा देशाच्या सन्मानाच्या शिखरावर रोवला आहे. महाराष्ट्रातील आठ जणांना खडतर ठिकाणी सेवेबद्दल शौर्यपदकं , वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल तीन जणांना तर गुणवत्तापूर्ण सेवा देणाऱ्या ४० जणांना पदकं घोषित झाली आहेत. ३७ शौर्यपदकांसह एकूण ४७ पदकं प्राप्त करून जम्मू-काश्मीर तृतीय, ३२ पदकांसह आसाम चतुर्थ आणि २९ पदके मिळवून ओडिशा तसेच गुजरातने पाचवे स्थान पटकावले आहे.
नागपूरला सात पदकांचा सन्मान
नागपूरला सात पदकांचा सन्मान मिळाला. त्यापैकी नुकतेच नागपुरातून पुण्यात बदलून गेलेले सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल, पोलीस कर्मचारी रमाकांत बावीस्कर, कल्पना धवड, रेल्वे सुरक्षा दलातील हवलदार ए रामाक्रीष्णा आणि एएएसआय सी. बी. सिंग यांना तसेच नागपूर मध्यवर्ती कारागृहातील कर्मचारी राजू हाते, संजय राजारामजी तलवारे तसेच विठ्ठल उगले आणि महेंद्र शहाणे यांनाही सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.
सीआरपीएफ अव्वलस्थानी !
दलनिहाय (फोर्सवाईज) कामगिरीचा आढावा घेऊन जाहिर झालेल्या पदकांपैकी एकूण १५४ पदके मिळवत केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) देशात अव्वलस्थान मिळवले आहे. सीआरपीएफने दोन राष्ट्रपती शौर्य पदकं, ८९ शौर्यपदकं, पाच वैशिष्टयपूर्ण सेवा पदकं आणि ५८ गुणवत्तापूर्ण सेवा पदकं जाहिर झाली आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एकूण ६१ पदके मिळवली आहेत. आयबीने ३४, सीबीआयने ३० तर सीआयएसएफने २६ पदके पटकावली आहेत.