स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 10:13 AM2018-10-06T10:13:59+5:302018-10-06T10:15:38+5:30
स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे.
आशिष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक ही सर्वांचीच जबाबदारी असून यासाठी सरकार, राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिक या सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. निवडणूक आयोग आपल्या परीने प्रयत्न करीत आहे, असे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांचे म्हणणे आहे.
शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले होेते. त्यावेळी लोकमतने त्यांच्याशी विशेष संवाद साधला. यावेळी अनेक प्रश्नांची उत्तरे देणे त्यांनी विशेषत्वाने टाळले. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे कठोर पालन आणि उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचे पालन केले जाते. आचारसंहिता उल्लंघन झाल्याचा प्रकार उघडकीस येताच कारवाई केली जाते. आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली. किती लोकांना दंड ठोठावला, या प्रश्नावर मात्र त्यांनी मौन धारण केले.
निवडणुकीदरम्यान होणाऱ्या बोगस मतदान कार्ड किंवा मतदानाबाबाा त्यांनी सांगितले की, बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी अभियान राबवित आहे. कुठल्याही प्रकारची माहिती उघडकीस येताच तात्काळ कारवाई केली जात आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये बोगस मतदार ओळख पत्र बनवणाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जात आहे का, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.