नागपुरातील मेडिकलमध्ये ‘मेटाबोलिक सिंड्रोम’चा स्वतंत्र विभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 07:59 PM2018-05-05T19:59:10+5:302018-05-05T19:59:22+5:30
जगात सुमारे २५ टक्के लोकसंख्या ही ‘मेटाबोलीक सिंड्रोम’ने पीडित आहेत. लठ्ठपणा आणि आळशी वृत्तीच्या जीवनशैलीमुळे ‘मेटाबोलीक सिंड्रोम’ (चयापचय संदर्भातील विकृती दर्शविणारी लक्षणे) वाढत आहे. यामुळे ‘टाईप-२’ मधुमेह व हृदयाच्या रक्तवाहिन्या संदर्भातील आजार वेळेपूर्वी होण्याचा धोका असतो. भारतात याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. याची दखल घेऊन मेडिकल प्रशासनाच्या पुढाकाराने रुग्णालयात याचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा प्रयत्न असून नुकतेच स्वीडन देशातील डॉक्टरांच्या चमूने रुग्णालयाची पाहणी करून याला सकारात्मकता दाखवली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगात सुमारे २५ टक्के लोकसंख्या ही ‘मेटाबोलीक सिंड्रोम’ने पीडित आहेत. लठ्ठपणा आणि आळशी वृत्तीच्या जीवनशैलीमुळे ‘मेटाबोलीक सिंड्रोम’ (चयापचय संदर्भातील विकृती दर्शविणारी लक्षणे) वाढत आहे. यामुळे ‘टाईप-२’ मधुमेह व हृदयाच्या रक्तवाहिन्या संदर्भातील आजार वेळेपूर्वी होण्याचा धोका असतो. भारतात याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. याची दखल घेऊन मेडिकल प्रशासनाच्या पुढाकाराने रुग्णालयात याचा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा प्रयत्न असून नुकतेच स्वीडन देशातील डॉक्टरांच्या चमूने रुग्णालयाची पाहणी करून याला सकारात्मकता दाखवली आहे.
मेटाबोलीक सिंड्रोमचा धोका वाढत्या वयात वाढत जातो. कंबरेच्या आजूबाजूला खूप जास्त चरबी हे मेटाबोलीक सिंड्रोमची शंका वाढविते. शिवाय, ज्यांना ‘ट्रायग्लिसराइड्स’ची औषध सुरू असल्यास आणि ‘सीरम एचडीएल’ पुरुषांमध्ये ४० मिग्रा. पेक्षा कमी आणि महिलांमध्ये ५० मिग्रा. पेक्षा कमी असल्यास आणि रक्तदाब १३०/८५ एमएम पेक्षा जास्त असल्यास किंवा रक्तदाबावर औषधोपचार सुरू असल्यास, याशिवाय रिकामे पोट असताना प्लाज्मा ग्लुकोजचे प्रमाण १०० मिग्रा. पेक्ष जास्त असल्यास किंवा ‘अॅलीवेटेड ब्लड ग्लुकोजवर’ उपचार सुरू असल्यास ही लक्षणेही मेटाबोलीक सिंड्रोमसाठी कारणीभूत ठरतात. परिणामी, टाईप-२ मधुमेह आणि हृदयाच्या रक्तवाहिनी संदर्भातील आजार होण्याचा धोका वाढतो. या सोबतच ‘फॅटी लिव्हर’, ‘फायब्रोसिस’ आणि ‘सिरोसीस’, ‘हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा’, गंभीर मूत्रपिंडाचे आजार, ‘पोलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम’, झोपेशी जुळलेल्या श्वसनाशी संबंधित समस्या आदी दुष्परिणाम पहायला मिळतात. अशा रुग्णांचे वेळीच निदान होऊन त्याला औषधोपचाराखाली आणण्यासाठी ‘मेटाबोलीक सिंड्रोम’चा स्वतंत्र विभाग सुरू करण्याचा मेडिकलचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्वीडन देशातील डॉक्टरांनी मदतीचा हात समोर केला आहे. शनिवार ५ मे रोजी स्वीडन येथील चार डॉक्टरांच्या चमूने मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभागाची पाहणी करून काही डॉक्टरांसोबत चर्चाही केली. लवकरच यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.