संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद

By admin | Published: September 2, 2015 04:22 AM2015-09-02T04:22:43+5:302015-09-02T04:22:43+5:30

इतरांकडे नाही पण आपल्याकडे आहे, तीच आपली वेगळी ओळख असते. केवळ महाराष्ट्रीयन असणे किंवा मराठी

Independent identity given by the Sanskrit means native nationalism | संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद

संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद

Next

नागपूर : इतरांकडे नाही पण आपल्याकडे आहे, तीच आपली वेगळी ओळख असते. केवळ महाराष्ट्रीयन असणे किंवा मराठी असणे ही ओळख नाही तर आपल्या मातृभाषेतून होणारे आकलन, त्याची संस्कृती संबद्धता, उच्चार आणि भाषा, संस्कृती आणि कला यांच्या वैशिष्ट्यपूर्णतेतून स्वतंत्र ओळख निर्माण होत असते. त्यामुळेच आपल्या संस्कृतीने दिलेली स्वतंत्र ओळख म्हणजेच देशीवाद. हा देशीवाद विशिष्ट प्रदेश, भाषेच्या लोकांना समृद्ध करणारा आणि त्यांची ओळख जपणारा असतो, असे मत मराठी सल्लागार समिती, साहित्य अकादमीचे संयोजक ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केले.
साहित्य अकादमी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मराठी विभाग आणि गिरीश गांधी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देशीवाद आणि मराठी कादंबरी’ विषयावरील द्विदिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. हा कार्यक्रम श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध भाषातज्ज्ञ गणेश देवी होते. प्रमुख अतिथी म्हणून साहित्य अकादमीचे प्रादेशिक सचिव कृष्णा किंबहुने, मराठी सल्लागार समितीचे सदस्य रंगनाथ पठारे, डॉ. अक्षयकुमार काळे, विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख शैलेंद्र लेंडे उपस्थित होते. नेमाडे म्हणाले, आपल्याला भाषेतून आणि संस्कृतीतून होणारे आकलन महत्त्वाचे आहे. कुचिपुडी, यक्षगान, ओडिसी, धराधरी नृत्याची परंपरा निर्माण करणारी मोठी माणसे त्या-त्या प्रदेशात झाली. महाराष्ट्रात तमाशाला आपण स्थान देऊ शकलो नाही. दशावतारात प्रत्येक अवताराने कुणीतरी पळवून नेलेले पुन्हा परत आणले. त्यानंतर जे हरविले ते परत आणणारा अकरावा अवतार झाला नाही. वाङ्मय प्रकारात, तत्त्वज्ञानात किंवा सामाजिक शास्त्रात विज्ञानासारखी प्रयोगसिद्धता करता येत नाही पण त्याची सत्यता विचारांती पटते. म. गांधींनी मॅन्टेस्टर कंपनीविरोधात चरख्याची चळवळ राबविली आणि त्याला प्रतिसाद मिळाला. यानंतर कंपनीला त्यांची चूक कळली कारण म. गांधी द्रष्टे होते. हल्ली आधुनिक होण्याच्या नादात लोक उपभोगी आणि चंगळवादी होत आहेत पण हे सारेच आपले नाही. ते बाजारीकरणाने आपल्यावर लादले गेले आहे. भाषेला पडणारे प्रश्न मांडणे हे साहित्याचे काम आहे. त्याची उत्तरे पुढची पिढी शोधत राहते, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)


स्मरणसंचित संपणे हीच भाषा मृत होण्याची लक्षणे - गणेश देवी
१९ व्या शतकात उदारीकरणाच्या सपाट्यात परंपरा वाईट आणि जुनाट असल्याचे वारे वाहिले. आधुनिकता म्हणजे चंगळवाद, उपभोग असा विचार लादला गेला आणि लोकांचे विचार व आवडीनिवडी बदलण्याचाच प्रयत्न झाला. यात दिग्भ्रमितता वाढली. जगातील सहा हजार भाषांपैकी चार हजार भाषा सध्या संपण्याच्या मार्गावर आहेत कारण त्या भाषांमध्ये भूतकाळ दर्शविणाऱ्या वाक्यांची विविधता नष्ट होते आहे. भाषेतून भूतकाळ समर्थपणे सांगता येत नाही आणि स्मरणसंचित सांभाळण्यात भाषा अपयशी ठरते तेव्हा ती मृतप्राय होते. भाषिक व्यवहार ठप्प पडले की त्या भाषेत जगणे कठीण होते आणि लोक जगण्यासाठी इतर भाषा आत्मसात करतात. त्यामुळेच भाषेला भूतकाळ सांभाळता आला पाहिजे, असे गणेशदेवी म्हणाले. परकीय आक्रमणानंतर वसाहतवादातून आलेले साहित्य असा समज झाला आणि दुसरीकडे राष्ट्र या संकल्पनेची निर्मिती या दोन जखमा झाल्या. राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक धर्म, एक संस्कृती ही कल्पना युरोपात आली. त्याप्रमाणेच भारतातही एक भाषा लादण्याचा प्रयत्न झाला पण अखेर १४ भारतीय भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून जाहीर करावे लागले. वसाहतवादाचे साहित्य आणि राष्ट्र संकल्पनेच्या या दोन जखमातून बाहेर पडल्याशिवाय आपण सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकणार नाही. हा शोध सुरूच राहील, असे ते म्हणाले. रंगनाथ पठारे यांनी बीजभाषणातून देशीवाद आणि काही आव्हानांचा उहापोह करताना संपूर्ण चर्चेचे आयाम काय असू शकतात, याचे सूतोवाच केले. देशीवाद आधुनिकीकरणाला विरोध करणारा नाही पण देशी स्वरूप आत्मसात करणारा असावा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक अक्षयकुमार काळे, स्वागतभाषण कृष्णा किंबहुने आणि संचालन कोमल ठाकरे यांनी केले. आभार शैलेंद्र लेंडे यांनी मानले. चर्चासत्रापूर्वी ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी भालचंद्र नेमाडे यांचा सत्कार केला. याप्रसंगी गिरीश गांधी, प्रमोद मुनघाटे, श्याम धोंड प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Independent identity given by the Sanskrit means native nationalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.