राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:19 AM2017-10-04T01:19:36+5:302017-10-04T01:19:59+5:30
राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारली जाईल. कारागृहातील गैरप्रकार आणि कैद्यांमधील वाद व त्यातून होणारे गुन्हे टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारली जाईल. कारागृहातील गैरप्रकार आणि कैद्यांमधील वाद व त्यातून होणारे गुन्हे टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरेल. त्यात प्रशिक्षित मनुष्यबळ असेल. या यंत्रणेवर केला जाणारा खर्च शासनाकडून मिळणाºया फंडातून केला जाईल, अशी माहिती राज्याचे कारागृह महानिरीक्षक, अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रकारांना दिली.
डॉ. उपाध्याय गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात आहेत. भायखळा कारागृहात मंजुळा शेट्ये तसेच त्यानंतर नागपूर कारागृहात आयुष पुगलियाच्या हत्याकांडाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली.
विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या खतरनाक गुन्हेगारांना सांभाळण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनावर असते. कोणत्या गुन्हेगाराच्या मनात काय सुरू आहे, ते कळणे शक्य नाही. प्रत्येक गुन्हेगारावर लक्ष ठेवणे अपुºया मनुष्यबळामुळे शक्य होत नाही. त्यामुळे अशा घटनांवर किंवा नेहमी होणाºया हाणामाºयांवर लक्ष ठेवणे शक्य नाही. हे सर्व लक्षात घेता पोलिसांप्रमाणेच कारागृहात स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा उभारण्याची तयारी चालविली आहे. सध्या कारागृह प्रशासनात कैद्यांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त आहे आणि त्यांना सांभाळण्याची जबाबदारी असलेले अधिकारी, कर्मचाºयांचे संख्याबळ फारच तोकडे आहे. सुरक्षेच्या मानकानुसार सात कैद्यांना सांभाळण्यासाठी एक सुरक्षा रक्षक असावा. मात्र, सध्या एक सुरक्षा रक्षक २० ते २५ कैद्यांना सांभाळत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कारागृहातील कैद्यांच्या भानगडींवर लक्ष ठेवणे शक्य नाही. अशा स्थितीत गुप्तचर यंत्रणेसाठी स्वतंत्र आणि प्रशिक्षित कर्मचारीच नेमावे लागणार आहे. त्यासाठी येणारा खर्च सरकारने उपलब्ध करून द्यावा, असा विनंतीवजा प्रस्ताव आम्ही सरकारला पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली असून, लवकरच राज्यातील कारागृहात गुप्तचर यंत्रणा कार्यरत होणार आहे. कारागृहातील गैरप्रकार, कैद्यांमधील वाद तसेच अन्य प्रकारावर ही यंत्रणा लक्ष ठेवेल. तसा दैनंदिन अहवाल ते कारागृह प्रशासनाला कळवतील. त्यामुळे कारागृहात घडू पाहणारे संभाव्य गुन्हे टाळता येतील, असेही ते म्हणाले.
अनेक गुन्हे टळले
प्रायोगिक स्तरावर काही कारागृहात गुप्तचर पेरण्यात आले आहे. त्यामुळे अनेक गंभीर गुन्हे टळल्याचा दावाही डॉ. उपाध्याय यांनी केला. हे गुन्हे टळल्यामुळे ते चर्चेला आले नाही, असे सांगतानाच घटना घडल्या की त्याची चर्चा होते, मात्र घटना घडलीच नाही तर त्याची चर्चा होण्याचा प्रश्नच नाही, अशी पुष्टी त्यांनी आपल्या दाव्याला जोडली.
सुरक्षेसाठी प्लास्टिकचा वापर
मंजुळा शेट्येची हत्या झाली मात्र काही कटकारस्थान करून झालेली नाही. अचानक घडलेली ही घटना आहे. काही अधिकारी-कर्मचाºयांच्या चुकीमुळे हे घडले, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. यापुढे असा प्रकार घडणार नाही, त्यासाठी आम्ही समुपदेशनावर भर देणार असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.
आयुष पुगलियाची हत्या आणि अन्य काही ठिकाणी झालेल्या हाणामाºयात कैद्यांनी अॅल्युमिनियमच्या ताटाचा, अन्य भांड्याचा शस्त्रासारखा वापर केला आहे. ते लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये आता कैद्यांना जेवणासाठी ताट (प्लेट) आणि वाट्या तसेच ग्लासदेखील प्लास्टिकचेच वापरले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.