स्वतंत्र विदर्भ व विजेसाठी आंदोलन
By admin | Published: October 4, 2015 03:23 AM2015-10-04T03:23:29+5:302015-10-04T03:23:29+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्य आणि विजेच्या प्रश्नासाठी विदर्भभर आंदोलन पेटवू, असा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी केला.
धरणे आंदोलन : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा संकल्प
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य आणि विजेच्या प्रश्नासाठी विदर्भभर आंदोलन पेटवू, असा संकल्प विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी केला.
विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे काटोल रोड चौक येथील वीज महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांमध्येसुद्धा धरणे आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, या मुख्य मागणीसह विदर्भातील जनतेसाठी सगळ्या स्लॅबमधील विजेचे दर आजच्या पेक्षा निम्म्यावर आणावे.
विदर्भात कोळशावर आधारित अधिकच्या वीज निर्मितीकरिता ४० मान्यताप्राप्त व ९२ इतर प्रस्तावित प्रकल्प मिळून एकूण १३२ प्रकल्पांची मान्यता रद्द करण्यात यावी, चंद्रपूर, कोराडी, मौदा, पारस या शहरांमध्ये विजेमुळे निर्माण होणारे प्रदूषण प्राधान्याने हटविण्यात यावे, शेतकऱ्यांचा कृषीपंपाचा बॅकलॉग तातडीने दूर करा आणि शेती पंपाचे १८ तासांचे लोडशेडिंग बंद करून २४ तास पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी, आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
आंदोलनाचे हे सत्र असेच सुरू राहणार असून यानंतर ९ आणि २५ आॅक्टोबररोजी सुद्धा आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
धरणे आंदोलनात राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अॅड. नंदा पराते, अरुण केदार, दिलीप नरवडिया, धर्मराज रेवतकर, विष्णू आष्टीकर, श्याम वाघ, अनिल तिडके, राजेश श्रीवास्तव, भीमराव फुसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)