स्वतंत्र विदर्भ ही जनतेचीच चळवळ
By admin | Published: January 19, 2016 04:04 AM2016-01-19T04:04:39+5:302016-01-19T04:04:39+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पिंपरी- चिंचवड येथे आयोजित साहित्य संमेलनात बोलताना स्वतंत्र
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पिंपरी- चिंचवड येथे आयोजित साहित्य संमेलनात बोलताना स्वतंत्र विदर्भ ही स्वार्थी लोकांची चळवळ असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे विदर्भात तीव्र पडसाद उमटले आहे. विविध राजकीय पक्ष व विदर्भवादी संघटनांनी त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून स्वतंत्र विदर्भ ही येथील जनतेचीच चळवळ असून या चळवळीला खीळ घालण्याचा हा प्रकार असल्याचे येथील नेत्यांचे म्हणणे आहे.
जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार
स्वतंत्र विदर्भाबाबत जनतेत मतैक्य होण्याचे वातावरण निर्माण झालेले असताना पवारांचे वक्तव्य हे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार आहे. अपवाद वगळता स्वतंत्र विदर्भाचा विषय हाती घेणाऱ्यांना पराभूतच व्हावे लागले आहे, या पवारांच्या विधानाची नवनिर्मित विदर्भ माझा या पक्षाने विशेष नोंद घेतली असून आगामी काळात विदर्भातील मतदारच पवारांच्या पक्षावर विशेष लक्ष ठेवतील. शरद पवारांनी केलेले वक्तव्य विदर्भ राज्याच्या निर्मितीला व पर्यायाने विदर्भाच्या विकासास मारक असून विदर्भ माझा पक्षातर्फे या मनोवृत्तीचा जाहीर निषेध करण्यात येते.
राजकुमार तिरपुडे, नेते, विदर्भ माझा