स्वतंत्र विदर्भ राज्याची प्रतिरूप विधानसभा आजपासून
By admin | Published: October 3, 2016 02:46 AM2016-10-03T02:46:37+5:302016-10-03T02:46:37+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचाच एक भाग म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ राज्याची
चटप यांची मुख्यमंत्री म्हणून निवड : खांदेवाले-अर्थ, तर चक्रवर्ती-गृहमंत्री, विरोधीपक्ष नेतेपदी राम नेवले
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी आंदोलनाचाच एक भाग म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भ राज्याची दुसरी प्रतिरूप विधानसभा ३ व ४ आॅक्टोबर रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. शनिवारी विदर्भ राज्यातील ६२ आमदारांची निवड करण्यात आली होती. रविवारी आमदार निवास येथे या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी अॅड. वामनराव चटप यांची स्वतंत्र विदर्भ राज्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. तसेच विरोधी पक्षातर्फे राम नेवले यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. सत्तापक्षात ४० तर विरोधी पक्षात २२ आमदार राहतील.
या प्रतिरूप विधानसभा अंतर्गत स्वतंत्र विदर्भ राज्याचे मुख्यमंत्री अॅड. वामनराव चटप यांनी रविवारी आपले मंत्रिमंडळसुद्धा जाहीर केले. यात १४ कॅबिनेट तर १३ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. कॅबिनेट मंत्री पुढीलप्रमाणे- अॅड. वामनराव चटप मुख्यमंत्री (सामान्य प्रशासन विभाग), डॉ. श्रीनिवास खांदेवाले (अर्थ व नियोजन) , प्रबीरकुमार चक्रवर्ती (गृह व तुरुंग), डॉ. रमेश गजबे (आरोग्य व वैद्यकीय शिक्षण), धनंजय धार्मिक (उद्योग व वस्त्रोद्योग व खनिकर्म), दिलीपभाऊ बन्सोड (सामाजिक न्याय व सांस्कृतिक मंत्री), अरुण केदार (कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य व्यवसाय), धर्मराज रेवतकर (पाटबंधारे), टेकचंद कटरे (सहकार व पणन), आनंदराव वंजारी (विधी व न्याय), अॅड. नंदाताई पराते (आदिवासी विकास), संध्याताई इंगोले (ग्रामीण विकास व जलसंधारण), सरोजताई काशीकर (महिला व बालकल्याण), पुरुषोत्तम पाटील (अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण).
राज्यमंत्री : अरविंद देशमुख (शिक्षण व उच्च तंत्रशिक्षण, स्वतंत्र प्रभार), जगदीश बोंडे (महसूल, स्वतंत्र प्रभार), डॉ. दीपक मुंडे (सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण), अॅड. सुरेश वानखेडे (पाणीपुरवठा, परिवहन, स्वतंत्र प्रभार), राजेंद्रसिंग ठाकूर (आदिवासी विकास), किशोर पोतनवार (कामगार, रोजगार हमी योजना) (स्वतंत्र प्रभार), रियाज खान (अल्पसंख्यक व औकाफ ) (स्वतंत्र प्रभार), अॅड. अर्चना नंदघळे (संसदीय कार्य व ऊर्जा) स्वतंत्र प्रभार, अॅड. गोविंद भेंडारकर (वने व पर्यावरण, उत्पादन शुल्क), दिलीप नरवडिया (नगर विकास) (स्वतंत्र प्रभार), श्याम वाघ (क्रीडा व युवक कल्याण, कौशल्य विकास), प्रदीप धामणकर (सार्वजनिक बांधकाम विभाग) स्वतंत्र प्रभार आणि अॅड. विजय राऊत (विधी व न्याय). (प्रतिनिधी)
मधुकरराव निसर होणार राज्यपाल
स्वतंत्र विदर्भ राज्याचे राज्यपाल म्हणून सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय जनरल सेक्रटरी डॉ. मधुकरराव निसर यांची निवड करण्यात आली आहे. तर अॅड. मोरेश्वर टेंभुर्डे यांची विधानसभेचे अध्यक्ष आणि मधुभाऊ कुकडे यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच यवतमाळचे अॅड. अजय चमेडिया यांची स्वतंत्र विदर्भ राज्याचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय प्रशांत गावंडे (निवडणूक आयुक्त), रंजनाताई मामर्डे (महिला आयोगाच्या अध्यक्ष), हिराचंद बोरकुटे (वित्त आयोगाचे अध्यक्ष), सुधाताई पावडे (ओबीसी राज्य आयोग), शरद कारेकर (विशेष मागास प्रवर्ग), ताराबाई बारस्कर (अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष), कृष्णराव भोंगाडे ( अनुसूचित जाती आयोग), विदर्भ राज्य नागरी सेवा परीक्षा (प्रभाकर कोहळे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सक्षम विदर्भाचे मॉडेल सादर करणार
विदर्भ राज्य हे सक्षम कसे आहे, याचे मॉडेल या प्रतिरूप विधानसभेद्वारे जनतेसमोर सादर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यावेळी सक्षम विदर्भाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. विदर्भ राज्य स्वतंत्र झाले तर त्याची पुढची दिशा काय असेल, व्हीजन कसे राहायला हवे, हे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यावरील कर्ज, विजेची दरवाढ याचा फेरविचार केला जाईल, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले जाईल, असे अॅड. वामनराव चटप यांनी संगितले.
असे राहील प्रतिरूप विधानसभेचे कामकाज
सोमवारी प्रतिरूप विधानसभेच्या पहिल्या दिवशी राज्यपाल, अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री व आमदारांची शपथ होईल. राष्ट्रगीताने कामकाजाला सुरुवात होईल. सर्वप्रथम काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांना आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण होईल. आयोगांची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू होईल. अर्थमंत्री डॉ. श्रीनिवास खांदेवाले विदर्भ राज्याचा दुसरा अर्थसंकल्प सादर करतील. राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांचे अभिनंदन होईल. लक्षवेधी, शासकीय प्रस्ताव, यावर अर्धातास चर्चा होईल. दुसऱ्या दिवशी मंगळवारी विरोधी पक्षाच्यावतीने स्थगन प्रस्ताव सादर केला जाईल. प्रश्नोत्तरे, लक्षवेधी सूचना, अर्थसंकल्पावरील चर्चा आणि नंतर अर्थमंत्री उत्तर देतील. अशासकीय ठराव, अंतिम आठवडा प्रस्ताव, अर्धातास चर्चा आणि विधानसभेचा समारोप होईल.
विदर्भ हा आंदोलनानेच मिळेल
राजकीय प्रयोगाने विदर्भ मिळवण्याचे प्रयोग फसले आहेत. विदर्भ राज्य हे आंदोलनातूनच मिळेल. अॅड. श्रीहरी अणे आणि आमच्यात काही विषयांवर तात्त्विक मतभेद आहेत. त्यांना आंदोलनातून विदर्भ मिळेल असे वाटत नाही. परंतु आम्हाला मात्र आंदोलनातूनच विदर्भ मिळेल, असा विश्वास आहे.
-वामनराव चटप, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते