भारत-अफगाणिस्तानचे संबंध ऐतिहासिक

By Admin | Published: February 14, 2017 02:09 AM2017-02-14T02:09:06+5:302017-02-14T02:09:06+5:30

अफगाणिस्तान व भारत या देशातील संबंध ऐतिहासिक असून, संकटकाळी भारताने अफगाणिस्तानला नेहमीच मदत केली आहे.

India-Afghanistan relations are historic | भारत-अफगाणिस्तानचे संबंध ऐतिहासिक

भारत-अफगाणिस्तानचे संबंध ऐतिहासिक

googlenewsNext

महावाणिज्यदूत मोहम्मद अमन अमिन : अफगाणिस्तानच्या राजस्व अधिकाऱ्यांना नागपुरात प्रशिक्षण
नागपूर : अफगाणिस्तान व भारत या देशातील संबंध ऐतिहासिक असून, संकटकाळी भारताने अफगाणिस्तानला नेहमीच मदत केली आहे. हे संबंध काही विभागापुरते मर्यादित नसून दोन देशांना जोडणारे संबंध आहेत. गत दोन वर्षांमध्ये द्विपक्षीय संबंधामध्ये पुष्कळ सुधारणाही झाल्या आहेत, असे प्रतिपादन अफगाणिस्तानचे महावाणिज्यदूत मोहम्मद अमन अमिन यांनी येथे केले.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी, नागपूर येथे १३ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०१७ या कालावधीमध्ये अफगाणिस्तानच्या राजस्व विभागातील अधिकाऱ्यांच्या १० दिवसीय प्रशिक्षणाचे उद्घाटन सोमवारी महावाणिज्यदूत मोहम्मद अमन अमिन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक रंगनाथ झा, अतिरिक्त महासंचालक आर.के. चौबे, अतिरिक्त महासंचालिका लीना श्रीवास्तव, नौशाद अन्सारी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधित करताना अफगाणिस्तानचे महावाणिज्यदूत मोहम्मद अमिन यांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांना आयकरातील नैपुण्य मिळणार असून, त्यांचे सहकार्य राजस्व विभागास लाभेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक रंगनाथ झा यांनी स्वागतपर भाषणात अफगाणिस्तानच्या राजस्व अधिकाऱ्यांना अकादमीमध्ये शिक्षकवर्गाशी मोकळेपणाने संवाद साधण्याचे आवाहन केले.
अतिरिक्त महासंचालिका लीना श्रीवास्तव यांनी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा आराखडा उपस्थितांसमोर मांडला. २४ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षणात भारतीय कर-प्रशासनाच्या आढाव्यासोबतच आंतरराष्ट्रीय कर-प्रशासन व हस्तांतरण मूल्य (ट्रान्सफर प्रायजिंग) या संदर्भातील मुद्यांवरचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये आयकर कायद्याची माहिती, कर प्रशासनाची तत्त्वे, प्रक्रिया याविषयी अधिकाऱ्यांना अवगत केले जाईल. चौथ्या दिवसापासून ‘कलेक्शन मेकॅनिझम (संग्रह यंत्रणा) याविषयी मार्गदर्शन केले जाईल. पाचव्या दिवशी तपासणी यंत्रणा तसेच आंतरराष्ट्रीय कररचना व ट्रान्सफर प्रायजिंग यासंदर्भातील तीन दिवसीय विशेष प्रशिक्षण सत्रामध्ये आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी व्यावहारिक पैलू राजस्व अधिकाऱ्यांना समजावून सांगतील.
अधिकाऱ्यांना भारताची ओळख व्हावी, या दृष्टीने वर्धा येथील सेवाग्राम आश्रम, ताडोबा राष्ट्रीय उद्यान येथेसुद्धा पाठविण्यात येईल. स्थानिक अधिकाऱ्यांशी ओळख होण्याच्या दृष्टीने आरबीआय, नागपूर व मुंबई येथील कार्यालयातील कामकाजाचे अवलोकनही हे अधिकारी करतील. राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीतील भारतीय राजस्व सेवेच्या परीविक्षाधीन अधिकाऱ्यांसोबतही क्रिकेटचे व इतर खेळाचे मैत्रीपूर्ण सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक दिवशी योगाच्या सत्राने प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात होईल, अशी माहिती लीना श्रीवास्तव यांनी दिली.याप्रसंगी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे अधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. (प्रतिनिधी)

मुंबई-काबूल विमानसेवेचा मानस
दिल्ली-काबूल या हवाईमार्गाच्या धर्तीवरच मुंबई ते काबूल ही विमानसेवा सुरू करण्याचाही मानस असल्याचे अफगाणिस्तानचे महावाणिज्यदूत मोहम्मद अमन अमिन यांनी यावेळी सांगितले.

Web Title: India-Afghanistan relations are historic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.