पाकिस्तानप्रमाणे इंडिया आघाडीचा पराभव करू: रामदास आठवले
By आनंद डेकाटे | Published: October 23, 2023 04:18 PM2023-10-23T16:18:48+5:302023-10-23T16:19:33+5:30
संविधान बदलणार ही निव्वळ अफवा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विरोधकांनी तयार केलेली इंडिया आघाडी ही मोदींना हरवण्याचे स्वप्न पााहत आहेत. परंतु त्यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. क्रिकेटच्या सामन्यात ज्याप्रमाणे भारत पाकिस्तानचा पराभव करतो. त्याचप्रमाणे आोेम्ही इंडिया आघाडीचाही पराभव करू, असा विश्वास रिपाइं (आठवले)चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला.
सोमवारी ते नागपुरात आले असता रविभवन येथे पत्रपरिषदेत बोलत होते. आठवले म्हणाले, विरोधी पक्षाच्या आघाडीला इंडिया नाव देणे योग्य नाही. आमच्या पक्षाच्या नावातही इंडिया शब्द आहे. त्यामुळे त्यांनी हा शब्द वापरू नये, अशी आमची मागणी असून त्यासंदर्भात न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे. इंडिया आघाडीत सर्वच नेते पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. प्रत्येकालाच पंतप्रधान व्हायचे त्यामुळे त्यांच्यातच एकवाक्यता नाही. संविधान बदलणार ही निव्वळ अफवा आहे. विरोध पक्ष ही अफवा जाणीवपूर्वक पसरवत आहे, असेही ते म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार थांबला आहे. तो तातडीने व्हावा आणि त्यात आमच्या पक्षालाही एक मंत्रीपद मिळावे. यासोबतच दोन महामंडळ व कमिट्यांची नियुक्ती सुद्धा लवकरात लवकर व्हावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
पत्रपरिषदेला भूपेश थुलकर, दयाल बहादुरे. एड. विजय आगलावे, राजन वाघमारे, विनोद थुल उपस्थित होते.
- प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय रिपाइं ऐक्य अशक्य
रिपाइंचे एक्य व्हावे, असे मला प्रामाणिकपणे वाटते. अनेकदा तो प्रयत्नही झाला. परंतु प्रकाश आंबेड़कर यांच्याशिवाय रिपाइंचे एक्य शक्य नाही. त्यांना वगळून रिपाइंचे झालेले ऐक्य हे यशस्वी ठरत नाही, असा अनुभव आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून रिपाइंचे नेतृत्व स्वीकारावे. मी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.