जातीअंताशिवाय भारत विकसित होऊ शकत नाही :राहुल वानखेडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:15 AM2019-05-04T00:15:55+5:302019-05-04T00:18:29+5:30
आजही जातीयता जोपासली जात आहे. जोपर्यंत जातीयता आहे, तोपर्यंत भारत विकसित होऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजही जातीयता जोपासली जात आहे. जोपर्यंत जातीयता आहे, तोपर्यंत भारत विकसित होऊच शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल वानखेडे यांनी केले.
महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि कामगार दिनानिमित्त कास्ट्राईब संघटनेतर्फे उद्योग भवन सिव्हील लाईन्स येथे आयोजित ‘भारतातील कामगारांचे भवितव्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनचे अध्यक्ष अरुण गाडे होते. तर वन कामगार संघटनेचे अध्यक्ष अजय पाटील, वनामतचे माजी अतिरिक्त संचालक राजरत्न कुंभारे, आत्माचे उपसंचालक रविकांत गौतमी, डॉ. प्रदीप आगलावे, भय्यासाहेब शेलारे, गजानन थुल प्रमुख पाहुणे होते.
अरुण गाडे यांनी अध्यक्षीय भाषणात जातीवाद आणि भांडवलशाहीमुळे देश संक्रमणातून जात असल्याचे सांगितले. उच्चवर्ग व गरीब यांच्यात प्रचंड दरी निर्माण झाली आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांच्या वाव मिळत नाही. सर्वसामान्यांना न्याय प्राप्त करून द्यायचा असेल तर सर्व बहुजनांनी एकत्र येऊन आपला विकास घडवून आणावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र माणके यांनी केले. संचालन धर्मेश दुपारे यांनी तर सीताराम राठोड यांनी आभार मानले.
विविध पुरस्कार प्रदान
यावेळी कस्ट्राईब संघटनेतर्फे विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, साहित्यिक डॉ. सरोज आगलावे, माजी शिक्षणाधिकारी एन.ए. ठमके, सामाजिक कार्यकर्ता रमेश फुले, उपायुक्त सुधीर शंभरकर यांना कास्ट्राईब सामाजिक समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. संजय गोडघाटे व राजेश ढेंगरे यांना उत्कृष्ट कामगार, महेंद्र माणके उत्कृष्ट अधिकारी, मिलिंद कीर्ती, अमन कांबळे, शरद नागदिवे, राजेशकुमार सिंग, मनोहर चव्हाण यांना पत्रकारिता तर सिद्धार्थ उके यांना उत्कृष्ट संघटक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.