ऊर्जेशिवाय भारत आत्मनिर्भर, सुपर इकोनॉमी पॉवर होऊ शकत नाही - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 12:24 PM2022-07-30T12:24:55+5:302022-07-30T12:25:01+5:30
दीक्षाभूमीवर ऊर्जा महोत्सवाचे उद्घाटन
नागपूर : ऊर्जेशिवाय भारत आत्मनिर्भर आणि सुपर इकोनॉमी पॉवर होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला प्राणवायूएवढीच ऊर्जेची आवश्यकता असून ऊर्जेच्या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्यअंतर्गत पॉवर @२०४७ सर्वत्र साजरा करण्यात येत असून या अभियानाअंतर्गत दीक्षाभूमी येथील सभागृहात शुक्रवारी सायंकाळी महावितरणच्या वतीने ऊर्जा महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन करताना गडकरी बोलत होते.
गडकरी म्हणाले, महानिर्मितीचे कोलप्लाण्ट हे जुने झाले आहे. त्यामुळे त्यातून निर्माण होणारी वीज ही महाग आहे. त्यामुळे आगामी काळात थर्मल पॉवर प्लांट तयार करायचा की नाही, यावर चर्चा सुरू आहे. वास्तविक कोळसा खाणींजवळ वीजनिर्मिती केंद्र निर्माण झाले तर वाहतूक खर्चात बचत होऊन मिळणारी वीज स्वस्त मिळेल. आता सौरऊर्जेला अधिक प्रोत्साहन मिळावे तसेच इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, सीएजी, एलएनजी याकडे आपण पाहिजे, असेही ते म्हणाले.
- महावितरणचा घेतला 'क्लास'
यावेळी गडकरी यांनी महावितरणचा वर्ग घेतला. ते म्हणाले, वीज तोटा प्रचंड आहे. ४५ हजार कोटींची थकबाकी आहे. तोटा कमी केला नाही, तर भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होईल. वितरणातील २४ टक्के तोटा कमी होणे आवश्यक आहे. वीज चोऱ्या रोखणे आणि पारदर्शकता येणे आवश्यक आहे. किमान आपला पगार निघेल इतक्या नफ्यात तरी कंपनी असायला हवी, असा चिमटा त्यांनी काढला. प्रीपेड मीटर आणण्याचा निर्णय नुकताच शासनाने घेतला असल्याचे कळते. यामुळे तोटा कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.