अमेरिकेपुढे जाण्याची भारत, चीनला संधी, राष्ट्रसंघाचे सद्भावना राजदूत पवन सुखदेव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:47 AM2017-09-16T03:47:58+5:302017-09-16T03:48:02+5:30
भारत आणि चीनसाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेपुढे जाण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे, असे मत राष्ट्रसंघाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाचे सद्भावना राजदूत पवन सुखदेव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
- उदय अंधारे
नागपूर : अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे दीर्घकालीन परिणाम पाहता भारत आणि चीनसाठी अमेरिकन अर्थव्यवस्थेपुढे जाण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे, असे मत राष्ट्रसंघाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाचे सद्भावना राजदूत पवन सुखदेव यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
नीरी येथील एका कार्यक्रमानिमित्त पवन सुखदेव येथे आले होते. ते म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान कराराची खिल्ली उडवणे चुकीचे आहे. पॅरिस कराराचे लक्ष्य गाठण्यासाठी भारत व चीन हे देश अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात ई-तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील अर्थव्यवस्थेचा सतत विकास होत जाईल. या करारातून बाहेर पडणे म्हणजे पेट्रोलियम उत्पादनांवर अवलंबून राहणे, होय. ही बाब देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी व विकासाचे लक्ष्य कठीण करण्यास कारणीभूत ठरेल असे सुखदेव यांनी सांगितले.
पर्यावरण प्रदूषित करणाºया पारंपरिक पदार्थांपेक्षा ई-वेस्ट अधिक धोकादायक आहे काय, अशी विचारणा केली असता सुखदेव म्हणाले, सुमारे ७० टक्के ई-वेस्टपासून पुनर्निर्मिती करता येते. त्यामुळे पर्यावरण व हवामानावर त्याचा कमी परिणाम होतो. बुलडोजर व ट्रॅक्टर निर्मिती करणारी कॅटरपिलर कंपनी त्यांच्याकडील ७८ टक्के ई-वेस्टपासून पुनर्निर्मिती करीत आहे. पर्यावरण वाचविण्यासाठी आपल्याला आता विविध समस्यांवर खर्चाला परवडणारे व दीर्घ काळ चालणारे उपाय शोधण्याची गरज आहे.