भारत बंद; नागपुरात आंदोलकांनी २५ मिनिटे रोखली तामिळनाडू एक्स्प्रेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 08:18 PM2018-04-02T20:18:53+5:302018-04-02T20:19:04+5:30
दलित संघटनांनी अॅट्रॉसिटी अॅक्टच्या संदर्भात केलेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीकडे जाणारी तामिळनाडू एक्स्प्रेस सोमवारी दुपारी अर्धा तास रोखुन धरल्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दलित संघटनांनी अॅट्रॉसिटी अॅक्टच्या संदर्भात केलेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीकडे जाणारी तामिळनाडू एक्स्प्रेस सोमवारी दुपारी अर्धा तास रोखुन धरल्यामुळे काही काळासाठी तणाव निर्माण झाला. रेल्वे सुरक्षा दलाने आंदोलकांना बाजूला सारुन ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली.
भारत बंद दरम्यान दलित संघटनांचे कार्यकर्ते नागपुरात आंदोलन करीत होते. दुपारी २.५० वाजता आंदोलक गुरुद्वारा पुलाजवळून जात होते. तेवढ्यात सिग्नल न दिल्यामुळे आऊटरवर थांबलेली मा
लगाडी त्यांना दिसली. आंदोलक गुरुद्वाराजवळील पुलावर चढले. आधीच थांबलेल्या मालगाडीच्या समोर ते उभे झाले. आंदोलनकर्त्यांनी मालगाडीवर दगडफेक करून लोकोपायलटची कॉलर पकडली. मालगाडीला ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे ती निघाली असताना पुन्हा आंदोलनकर्त्यांची संख्या वाढल्यामुळे मालगाडीच्या लोकोपायलटने मालगाडी थांबविली. जवळपास १०० आंदोलक मालगाडीच्या समोर उभे होते. तेवढ्यात रेल्वेगाडी क्रमांक १२६२१ चेन्नई-दिल्ली तामिळनाडू एक्स्प्रेस दिल्लीकडे जात होती. रेल्वे रुळावर आंदोलकांचा जमाव पाहून तामिळनाडू एक्स्प्रेसच्या लोकोपायलटने दुपारी २.५१ वाजता गाडी थांबविली. रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रुळावरील आंदोलकांना बाजूला केले. त्यानंतर दुपारी ३.१६ वाजता तामिळनाडू एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना झाली. तब्बल २५ मिनिटे आंदोलकांनी ही गाडी रोखून धरली होती. आंदोलनकर्त्यांना रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे रुळावरून हटविल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत झाला.