भारतीय क्रिकेटर उमेश यादवला ४४ लाखांचा गंडा; मित्रानेच केला विश्वासघात
By योगेश पांडे | Published: January 21, 2023 06:36 PM2023-01-21T18:36:36+5:302023-01-21T18:38:41+5:30
व्यवस्थापक असताना उमेशऐवजी स्वत:च्याच नावावर खरेदी केली प्रॉपर्टी
नागपूर : आपल्या जिवलग मित्रावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू उमेश यादवला चांगलेच महागात पडले आहे. मित्राने पॉवर ऑफ अटॉर्नीचा उपयोग करून व्यवस्थापक असताना उमेशऐवजी स्वत:च्याच नावाने ४४ लाखांची प्रॉपर्टी खरेदी केली. आश्चर्याची बाब म्हणजे हा प्रकार घडल्यावर तब्बल सात वर्षांनंतर उमेशने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शैलेश दत्ता ठाकरे (३७, कोराडी) असे आरोपीचे नाव आहे. उमेश व शैलेशची २००७ साली ओळख झाली. २०१० मध्ये उमेशची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यावर तो व्यस्त झाला. आयकर व इतर प्रशासकीय कामांसाठी त्याला शैलेश मदत करायचा. २०१३ पासून उमेशने शैलेशला व्यवस्थापक म्हणून कामावर ठेवले व त्याला दर महिन्याला ५० हजार रुपये वेतन देत होता. मित्र असल्याने याचा कुठलाही लेखी करारनामा केला नव्हता. उमेशने त्याच्या नावावर पॉवर ऑफ अटॉर्नी करून दिली होती. शैलेशने याचाच गैरफायदा घेतला.
२०१४ साली गांधीसागर तलावाजवळील एक प्रॉपर्टी ४४ लाखांमध्ये खरेदी करण्याचे ठरले. उमेशच्या वतीने शैलेश हा व्यवहार पाहणार होता. उमेशने शैलेशच्या बॅंक खात्यात ४४ लाख रुपये पाठविले. परंतु शैलेशने उमेशच्या ऐवजी स्वत:च्याच नावावर मालमत्ता खरेदी केली. जून २०१५ मध्ये उमेशने मालमत्ता खरेदी कधी करायचे असे विचारले असता ती मालमत्ता मी स्वत: घेतल्याचे शैलेशने सांगितले. यामुळे उमेशला धक्का बसला.
चांगला मित्र असल्याने उमेशने त्याला जास्त काही न बोलता पैसे परत दे किंवा मालमत्ता माझ्या नावावर कर असे म्हटले. मात्र तेव्हापासून शैलेशने अद्यापही यापैकी काहीही केलेले नाही. अखेरीस उमेशने कोराडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी शैलेशविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे याचा तपास सोपविला आहे.
शैलेश साधायचा कंपन्यांशी समन्वय
शैलेशच्या माध्यमातूनच उमेश यादवने अगोदर चार मालमत्ता खरेदी केल्या होत्या. अगदी विविध कंपन्यांसोबत ब्रॅंड ॲंबेसेडर किंवा प्रमोशनसाठीदेखील समन्वय साधण्याची जबाबदारी शैलेशकडेच होती. संबंधित प्रकार हा २०१५ मध्ये घडला. यानंतर सात वर्ष लोटून गेल्यावर उमेशने यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.