भारत नेपाळी टोळी समाजाकरिता धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:08 AM2021-05-15T04:08:09+5:302021-05-15T04:08:09+5:30
नागपूर : गंभीर गुन्हे करण्यासाठी कुख्यात असलेली भारत नेपाळी टोळी समाजाकरिता धोकादायक आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ...
नागपूर : गंभीर गुन्हे करण्यासाठी कुख्यात असलेली भारत नेपाळी टोळी समाजाकरिता धोकादायक आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवून या टोळीतील एका घातक गुन्हेगाराला संचित रजा मंजूर करण्यास नकार दिला. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
रविप्रकाश रामशिरोमणी सिंग (३७) असे गुन्हेगाराचे नाव असून तो आमवा (खुर्द), ता. शाहगंज, जि. जॉनपूर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे. तो सध्या अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला मुंबईतील सत्र न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात ही शिक्षा सुनावली आहे़ आतापर्यंत त्याने १० वर्षे ६ महिने शिक्षा भोगली आहे. याशिवाय त्याला मोक्का अंतर्गतही शिक्षा झाली आहे. तसेच, त्याच्याविरुध्द इतर काही गंभीर गुन्ह्यांचे खटले प्रलंबित आहेत.
सिंगने १ ऑक्टोबर २०२० रोजी कारागृह प्रशासनाला अर्ज करून २८ दिवसाची संचित रजा मागितली होती. त्यावर लवकर निर्णय घेण्यात आला नाही. परिणामी, सिंगने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ती याचिका प्रलंबित असताना अमरावती मध्यवर्ती कारागृह अधीक्षकांनी १९ एप्रिल २०२१ रोजी तो अर्ज फेटाळला. तसेच, न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून भारत नेपाळी टोळीचे गुन्हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व समाजाला या टोळीपासून वाचवण्यासाठी सिंगची याचिका खारीज करण्याची विनंती केली. न्यायालयाला त्यात तथ्य आढळून आल्यामुळे सिंगची याचिका गुणवत्ताहीन ठरवून खारीज करण्यात आली.