भारताला कुणाकडूनही बुद्ध शिकण्याची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 08:28 PM2018-06-21T20:28:31+5:302018-06-21T20:28:47+5:30
चीनच्या मते आमचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे, जपान आणि थायलंडही आमच्याकडून भारताला बुद्धीझम शिकावे लागेल, असे म्हणतो. परंतु जेथे बुद्धाचा जन्म झाला त्या भारत देशाला इतरांकडून बुद्ध शिकण्याची आणि उपदेश घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन थायलंड येथील प्रसिद्ध जागतिक बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरू भदंत फ्रा अनिल शाक्य यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चीनच्या मते आमचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे, जपान आणि थायलंडही आमच्याकडून भारताला बुद्धीझम शिकावे लागेल, असे म्हणतो. परंतु जेथे बुद्धाचा जन्म झाला त्या भारत देशाला इतरांकडून बुद्ध शिकण्याची आणि उपदेश घेण्याची गरज नाही, असे प्रतिपादन थायलंड येथील प्रसिद्ध जागतिक बौद्ध विद्यापीठाचे कुलगुरू भदंत फ्रा अनिल शाक्य यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्रातर्फे आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात, कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम, पाली, प्राकृत विभागाचे प्रमुख डॉ. नीरज बोधी उपस्थित होते. भदंत अनिल शाक्य म्हणाले, खरा बुद्ध धर्म हा कुणालाच कळालेला नाही. भगवान बुद्धांनी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सारनाथला दिलेल्या उपदेशामुळे रूढी, परंपरा, धर्मवादाला तडा गेला. शांतीसाठी आजकाल परिषदांचे आयोजन करण्यात येते. त्यात खरी शांती नसून प्रत्यक्ष कृती होत नाही. शांती ही जगण्याच्या सर्व वस्तू मिळाल्याशिवाय मिळत नाही. पाश्चात्यांनी अनेक बुद्ध धर्म निर्माण केले. लोकांना बुद्ध धर्मापासून दूर नेण्यासाठी त्यांनी मन कलुषित करण्याला सुरुवात केली. बुद्ध हे शाश्वत सत्य आहे. बुद्ध होणे म्हणजे शाश्वत सत्यापर्यंत पोहोचणे. आपल्याला मिळत असलेल्या मिळकतीपैकी २५ टक्के जवळ ठेवणे, २५ टक्के दान करणे आणि ५० टक्के समाजाला परत करणे हे बुद्धाचे जगण्याचे अर्थशास्त्र आहे. त्यामुळे बौद्ध अध्ययन केंद्रातून खरे बुद्धीस्ट तत्त्वज्ञान शिकविणे ही विद्यापीठाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात म्हणाले, सध्या देशात असमानता पसरली आहे. गरीब अधिकच गरीब होत चालला असून श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे. त्यामुळे वंचित शोषितांच्या विकासासाठी काम करणे हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजेत. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी बुद्धांनी जगाला तारणारे महान तत्त्वज्ञान दिल्याचे सांगून करुणा, शांती, समानता ही मूल्ये जवळपास सर्वच धर्मात समान असल्याचे सांगितले. संचालन डॉ. विकास जांभुळकर यांनी केले. आभार डॉ. नीरज बोधी यांनी मानले. परिषदेला विविध देशातून आलेले प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाला पुन्हा धम्मचक्र प्रवर्तनाची गरज
संयुक्त राष्ट्रातर्फे चिरंतन विकासाचा प्रचार-प्रसार करण्यात येत आहे. परंतु चिरंतन विकास म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन होत. यात धम्म म्हणजे धरुन ठेवणे, चक्र म्हणजे पुढे जाणे आणि प्रवर्तन म्हणजे बदल होय. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन हेच चिरंतन विकासाचे मॉडेल असून देशाला शाश्वत विकासाकडे नेण्यासाठी पुन्हा धम्मचक्र प्रवर्तनाची गरज आहे, असे मत भदंत अनिल शाक्य यांनी मांडले.