भारताला ‘एनजीओ’ची गरजच नाही
By admin | Published: February 26, 2017 02:32 AM2017-02-26T02:32:52+5:302017-02-26T02:32:52+5:30
स्वयंसेवी संस्था ज्यांना आम्ही आधुनिक भाषेत ‘एनजीओ’ म्हणतो त्यांची भारतीय समाजाला काहीच गरज नाही.
एस. गुरुमूर्ती : सेतूबंधन कार्यक्रमाचा समारोप
नागपूर : स्वयंसेवी संस्था ज्यांना आम्ही आधुनिक भाषेत ‘एनजीओ’ म्हणतो त्यांची भारतीय समाजाला काहीच गरज नाही. कारण, दातृत्व हे भारतीयांच्या रक्तातच आहे. या देशातील ७९ टक्के कुटुंबे आजच्या व्यावसायिक युगातही दानधर्म करतात. असे दान करणाऱ्या २५ टक्के कुटुंबांचे मासिक उत्पन्न आठ हजारांपेक्षाही कमी आहे, असे विचार ज्येष्ठ पत्रकार व अर्थततज्ज्ञ स्वामीनाथन गुरुमूर्ती यांनी व्यक्त केले. रेशीमबाग येथे आयोजित सेतूबंधन या कार्यक्रमाच्या समारोपीय सत्रात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विदर्भ वैभवचे अध्यक्ष हेमंत चाफले आणि उद्योजक हकिमुद्दीन अली उपस्थित होते. देशात वेगाने वाढणाऱ्या चुकीच्या प्रवृत्तीवर एस. गुरुमूर्ती यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले, भारत हा गौरवशाली परंपरा लाभलेला देश आहे. परंतु आपल्या देशातीलच काही लोक आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात राजकीय पुढारी आणि आमच्या मीडियाचाही समावेश आहे. दिल्लीत निर्भया कांड घडले तेव्हा मीडियाने असे चित्र उभे केले जणू भारत ही बलात्काराची राजधानी बनली आहे. जेव्हा की भारताच्या तुलनेत कितीतरी अधिक बलात्काराच्या घटना अमेरिकेत होतात. परंतु तेथे अशा नकारात्मक बातम्यांना जागा दिली जात नाही. या देशात अनेक चांगल्या गोष्टी घडतात त्यांना अशी आक्रमक प्रसिद्धी दिली जात नाही, हे आमचे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी ६० स्वयंसेवी संस्थांच्या कार्याबाबत गोळा केलेल्या माहितीची एक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
समाजहिताचे कार्य करणाऱ्या काही सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीचे धनादेशही पाहुण्यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.(प्रतिनिधी)
कॉर्पोरेटस्चा पैसा व्हाया एनजीओ दहशतवाद्यांकडे
भारतातील काही स्वयंसेवी संस्थांचे ध्येयच पैसा कमावणे आहे. त्यांना समाजहिताशी काही घेणेदेणे नाही. अशा संस्था कॉर्पोरेटस् संस्थांमधील काळा पैसा पांढरा करीत आहेत. ‘सीएसआर’च्या नावावर आर्थिक गैरव्यहार घडत आहेत. काही स्वयंसेवी संस्था तर हा पैसा कट्टरवाद व दहतवादाला खतपाणी घालणाऱ्या संस्थांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत, असा गंभीर आरोपही यावेळी एस. गुरुमूर्ती यांनी आपल्या भाषणात केला.