भारताकडे जगाला नवी दिशा देण्याची क्षमता : ज्ञानेश्वर मुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 09:43 PM2019-04-13T21:43:00+5:302019-04-13T21:45:57+5:30
भारताइतकी विविधता जगात कुठेही नाही. भाषा, पंथ, धर्म अशा अनेक विविधता आहेत. मात्र तरी ते एकत्र सुखी समाधानाने राहतात. हीच खरी येथील नागरिकांची क्षमता आहे. यातून आपण जगाला एक चांगले मॉडेल देऊ शकतो. जगाला नवी दिशा देण्याची क्षमता भारताकडे आहे. परंतु ते करीत असताना भारतीय संविधान हे एकमेव मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पराराष्ट्र सचिव व माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताइतकी विविधता जगात कुठेही नाही. भाषा, पंथ, धर्म अशा अनेक विविधता आहेत. मात्र तरी ते एकत्र सुखी समाधानाने राहतात. हीच खरी येथील नागरिकांची क्षमता आहे. यातून आपण जगाला एक चांगले मॉडेल देऊ शकतो. जगाला नवी दिशा देण्याची क्षमता भारताकडे आहे. परंतु ते करीत असताना भारतीय संविधान हे एकमेव मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त पराराष्ट्र सचिव व माजी राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी येथे केले.
विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल (वेद)तर्फे शनिवारी सायंकाळी प्रेस क्लब सिव्हील लाईन्स येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख व राहुल उपगन्लावार प्रामुख्याने उपस्थित होते. ‘भारताची मागील ३५ वर्षाची वाटचाल’हा व्याख्यानाचा विषय होता.
डॉ. मुळे म्हणाले, स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही आपली ओळख जात हीच आहे. निवडणूक सुद्धा जातीच्या आधारावरच लढवली जात आहे. आपण संकुचित विचारात जगतो आहोत. यातून बाहेर पडण्याची गरज आहे. इतर देशांचा अभ्यास करायला हवा. आज आपण ग्लोबल झालो आहोत. सोशल मीडियामुळे जगातील कुठल्याही देशातील व्यक्तीसोबत आपण जुळलेलो आहोत. हीच खरी सुंदरता आहे. राजदूत हा भारताबाहेर राहून देशाचे रक्षण करणारा खऱ्या अर्थाने देशाचा सैनिकच आहे. यावेळी त्यांनी विविध देशांमध्ये काम करीत असताना कशा प्रकारे देशाची सेवा करता आली, याचे किस्से सांगितले.
संचालन योगिता कस्तुरे यांनी केले. शिवकुमार राव यांनी आभार मानले.
जगात कुठेही फसलेल्या भारतीयाला सुरक्षित बाहेर काढण्याची क्षमता
डॉ. मुळे यांनी सांगितले की, एक वेळ अशी होती की जागतिक स्तरावर काही समस्या निर्माण झाल्यास अमेरिकेकडे मदतीसाठी पाहावे लागत होते. परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही. आज जगात कुठल्याही देशात फसलेल्या भारतीयास सुरक्षित बाहेर काढण्याची क्षमता आपल्या देशात आहे. यासाठी विदेशी मंत्रालयाशी संपर्क करावा. आतापर्यंत ४० देशात फसलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेले आहे. जगाला आपली शक्ती दाखवण्याची ही एक चांगली संधी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘पासपोर्ट’ ही एक संधी
डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांना पासपोर्ट मॅन म्हणूनही ओळखले जाते. परराष्ट्र विभागात सचिव असताना त्यांनी आपल्या कार्यकाळात देशभरात ५१० पासपोर्टऑफिस सुरू केले. याबाबत बोलताना डॉ. मुळे म्हणाले पासपोर्ट हे केवळ एक दस्तावेज नसून ती एक संधी आहे. आजचा पासपोर्टधारक उद्या विदेशी पासपोर्ट धारकही होऊ शकतो. जगभरात विविध संधी आहेत.आपण त्याला नोकरी देऊ शकत नसू किंवा संधी देऊ शकत नसू आणि ती संधी त्याला विदेशात मिळत असेल तर त्याला जाऊ द्या, असेही ते म्हणाले.