भारत हिंदू राष्ट्रच आहे आणि राहिलही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:08 PM2018-05-10T12:08:20+5:302018-05-10T12:08:30+5:30

देश अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

India is a Hindu nation and will remain | भारत हिंदू राष्ट्रच आहे आणि राहिलही

भारत हिंदू राष्ट्रच आहे आणि राहिलही

Next
ठळक मुद्देविष्णू कोकजे यांचा लोकमतशी संवाददेश संक्रमण काळातून जातोय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, असे आरोप होत आहेत. मात्र देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याची वेगळी आवश्यकता नाही. देश अगोदरपासूनच हिंदू राष्ट्र आहे, असे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष व माजी न्यायमूर्ती विष्णू कोकजे यांनी व्यक्त केले. नागपुरात आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

जेव्हापासून मोदी सरकार सत्तेत आले आहे, तेव्हापासून देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आरोपांशी आपण सहमत आहात का ?
माझे हे स्पष्ट मत आहे की देशाला हिंदू राष्ट्र बनविण्याची अजिबा आवश्यकता नाही. संविधानातील सर्व तत्त्वेदेखील हिंदू धर्मातीलच आहेत. असे एक तरी तत्व दाखवून द्या, जे हिंदू धर्मातील नाही. आपले संविधान व हिंदू धर्म यात काहीच फरक नाही. हिंदू राष्ट्राबाबत बोलणे म्हणजेच संविधानानुसार भारतातील प्रणाली चालविणे असेच आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना काही लोकांकडून ‘जुमला’ म्हणूनच वापरण्यात येत आहे.

आपल्या नजरेत सध्या देशाची परिस्थिती कशी आहे ?
सद्यस्थितीत देश संक्रमण काळातून जात आहे. जो समाज विकासाकडे अग्रेसर असतो त्यात काही अडथळे येतातच. मागील ५०-६० वर्षांत अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. हिंदू समाज अस्पृश्यतेच्या जोखडातून बाहेर आला आहे. समाज बदलतो आहे. महिलादेखील स्वतंत्र व आत्मनिर्भर होत आहेत. हा निश्चितच ‘डार्क’ कालखंड नाही. जर कुणाला हा खराब कालखंड वाटत असेल तर तो त्याचा विचार आहे. अशा व्यक्तीला जाणुनबुजून विकास व बदल जाणून घ्यायचा नसेल.

काही माजी सनदी अधिकाऱ्यांचे मत आहे की देशात अंध:कार युग आहे. यावर आपण काय म्हणाल ?
काही निवृत्त सनदी अधिकारी देशात अंध:कार युग असल्याचा दावा करत आहेत. मात्र या व्यक्तींनी ३४ ते ४० वर्ष नोकरी केली. त्यावेळी त्यांनी प्रगती किंवा कायदा-सुव्यवस्था याचा विचार का केला नाही? ती त्यांची जबाबदारी नव्हती का ? यातील अनेक टीकाकार तर अंथरुणाला खिळले आहेत. उठूदेखील शकत नाही. तेथूनच ते प्रसिद्धीसाठी वाट्टेल तशी वक्तव्ये देत आहेत.

अगोदर आपण न्यायमूर्ती म्हणून निष्पक्ष व निर्विकार होता. मात्र आता एका विशिष्ट विचारधारेशी जुळला आहात. हे कसे काय ?
मी अगोदर न्यायमूर्ती होतो व आता विशिष्ट विचारधारेशी जुळलो आहे, यावर अनेकांना आक्षेप आहेत. कुठलीही व्यक्ती निष्पक्ष नसते, प्रत्येक व्यक्तीचे आपले विचार असतात. परंतु संवैधिनिक पदांवर काम करता असताना ते विचार कामाच्या आड येऊ दिले जात नाहीत. जर एखादी व्यक्ती हिंदू विचारांनी प्रेरित आहे तर ती नेहमी न्यायच करेल. मी लहानपणापासूनच स्वयंसेवक आहे. मी न्यायमूर्ती झालो तेव्हादेखील लोकांना माझी विचारसरणी माहिती होती.

विहिंपला एक आक्रमक संघटना म्हणून संबोधण्यात येते. आपल्या हाती सूत्रे आल्यानंतरदेखील विहिंपचा हा स्वभाव कायम राहील का ?
विहिंपला आक्रमक संघटना असे संबोधण्यात येते. मुळात हिंदुत्व आणि आक्रमकता या दोन्ही बाबी परस्परविरोधी आहेत. जो कट्टर हिंदू असतो तो आक्रमक कधीच नसतो. विहिंपवर आक्रमकतेचे आरोप लावणे अयोग्य आहे. आमची विचारधारा शांततेची आहे.

 राममंदिराचे निर्माण झाले पाहिजे हाच विहिंपचा सर्वात मोठा अजेंडा आहे का ?
राममंदिर अयोध्येतील नियोजित स्थळीच होणार हा आम्हाला विश्वास आहे. न्यायालयातदेखील आमच्याच बाजूने निकाल येईल. मात्र आमच्या अजेंड्यावर केवळ राममंदिरच नाही. विहिंपची स्थापना १९६४ साली झाली व तेव्हा तर राममंदिराचा मुद्दा नव्हताच. रामजन्मभूमी, कृष्ण जन्मभूमी, काशी येथे झालेल्या अतिक्रमणाला पाहून समाजातील लोक दु:खी होत होते व त्यांच्या भावनेतूनच राममंदिराची मागणी समोर आली.

Web Title: India is a Hindu nation and will remain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.