T20 World Cup, India vs Pakistan : भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होणे हे राष्ट्रहिताच्या विरोधात; योगगुरू रामदेवबाबा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 08:00 PM2021-10-23T20:00:52+5:302021-10-23T20:38:23+5:30
Nagpur News भारत-पाकिस्तानदरम्यान ( India vs Pakistan) होणाऱ्या क्रिकेट सामन्यांवर टीकास्र सोडताना, योगगुरू रामदेवबाबा यांनी, या दोन देशांदरम्यान सामने होणे हे राष्ट्रहित व राष्ट्रधर्माच्या विरोधात असल्याचे मत स्पष्ट केले आहे.
भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात उद्या महामुकाबला होणार आहे. क्रिकेट रसिकांना या सामन्याची प्रतीक्षा असली तरी काहींच्या मते भारतानं या सामन्यावर बहिष्कार टाकायला हवा... पाकिस्तानातून दहशतवादी कृत्यांना मिळणारं खतपाणी आणि मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर येथे सुरू असलेल्या हल्यांमुळे भारतानं शेजाऱ्यांसोबत क्रिकेट सामना खेळू नये अशी मागणी जोर धरतेय. त्यात योगगुरू व हरिद्वार येथील पतंजली योगपीठाचे संस्थापक स्वामी रामदेव ( Ramdev Baba) यांनीही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा राष्ट्रहित व राष्ट्रधर्माच्या विरोधात असल्याचे मत स्पष्ट केले आहे,
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवारी २४ ऑक्टोबर रोजी नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सामाजिक सौहार्द्राबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होणार आहे. या परिषदेसाठी स्वामी रामदेव यांचं आज नागपुरात आगमन झालं. त्यावेळी त्यांनी चालू घडामोडींवर आपली रोखठोक मतं मांडली.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीही काही दिवसांपूर्वी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर मोठं विधान केलं होतं. पाकिस्तानसोबतच्या संबंधांमध्ये काहीच सुधारणा होत नसेल. त्यांच्या कुरापती अशाच सुरू असतील तर भारत-पाक क्रिकेट सामना रद्द करण्याबाबतचा याचा विचार करायला हवा, असं गिरीराज सिंह म्हणाले होते.
पंजाब सरकारच्या मंत्र्यानंही केली मागणी
पंजाब सरकारमधील मंत्री परगट सिंग यांनीही भारत-पाक सामना रद्द करण्याची मागणी केली होती. भारत-पाक सामना रद्द केला गेला पाहिजे कारण सीमेवरील परिस्थिती सध्या चिंताजनक आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणावात आणखी वाढ होणार नाही याचा काळजी घेत सामना रद्द करण्याची गरज आहे, असं कॅबिनेट मंत्री परगट सिंग म्हणाले होती.
'एकीकडे जम्मू-काश्मीरमध्ये भारताचे 9 सैनिक शहीद झाले आणि दुसरीकडे मोदी सरकार 24 ऑक्टोबर रोजी क्रिकेट सामना खेळत आहे,'अशी टीका एआयएमआयएमचे(AIMIM) नेते आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी(Asaduddin Owaisi) यांनी केली होती.
बीसीसीआयनं स्पष्ट केली भूमिका
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला ( Rajeev Shukla) यांनी टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही, हे स्पष्ट केले. राजीव शुक्ला म्हणाले, दहशतवाद्यांविरोधात कठोरातील कठोर पाऊल उचलले जाईल. पण, आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराचा आम्ही निषेध करतो. दहशतवादी संघटनांना धडा शिकवला जाईल. पण, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याबद्दल बोलाल तर आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडिया शेजारील राष्ट्राविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही. भारतच काय, तर कोणताच संघ कोणत्याही प्रतिस्पर्धीविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही.''
T20 WC: Under ICC's international commitments can't refuse to play Pakistan, says BCCI VP Rajeev Shukla
— ANI Digital (@ani_digital) October 18, 2021
Read @ANI Story | https://t.co/Mdtl4toAjY#T20WorldCuppic.twitter.com/Lcj1G0CKhy
माघार घेतल्यास बसेल फटका
समजा भारतानं २४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्यातून माघार घेतली, तर त्याचा फटका टीम इंडियालाच बसेल. पाकिस्तानला वॉक ओव्हर मिळेलच, शिवाय आयते दोन गुणही मिळतील. अशात आयसीसीही टीम इंडियावर दंडात्मक कारवाई करू शकते. गुण गमावल्यानं टीम इंडियाचा पुढील प्रवास खडतर होऊ शकतो. आयसीसीलाही भारत-पाकिस्तान सामन्यातून बराच आर्थिक फायदा होणार आहे आणि त्यामुळे तेही हा सामना रद्द करू शकत नाहीत. या एका सामन्यानं स्पर्धेच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो.