प्लास्टिक निर्मूलनासाठी ‘इंडिया प्लॉग रन’ बुधवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 08:22 PM2019-10-01T20:22:44+5:302019-10-01T20:25:03+5:30
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कें द्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी उद्या बुधवारी २ ऑक्टोबरला महापालिका मुख्यालयासह सर्व दहा झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’अभियान राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कें द्र शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक निर्मूलनासाठी उद्या २ ऑक्टोबरला महापालिका मुख्यालयासह सर्व दहा झोनमध्ये ‘इंडिया प्लॉग रन’अभियान राबविण्यात येत आहे. सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत अभियान राबविले जाणार असून यात धावपटू, खेळाडू व विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, नागरिक सहभागी होतील. इंडिया प्लॉग रन अभियानाला जनआंदोलन स्वरुपात राबविले जाणार आहे.
इंडिया प्लॉग रन अभियान देशातील ५२ शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे. यात नागपूर शहराचा समावेश असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर आयुक्त राम जोशी, स्वच्छ भारत अभिानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार उपस्थित होते.
महापालिकेतर्फे ११ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात प्लास्टिक निर्मूलनासाठी झोन कार्यालय, शाळा, महाविद्यालये, दुकाने, बाजार आदी ठिकाणी जनजागृती करण्यात आली. पुढचा टप्पा म्हणून आज बुधवारी इंडिया प्लॉग रनचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सहभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलनाचा जागर करण्यात येणार आहे. प्लॉग रनमध्ये शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. याशिवाय शहरातील स्केटिंग व दिव्यांग क्रिकेट संघातील खेळाडूही या अभियानामध्ये सहभागी होऊ न प्लास्टिक निर्मूलनासाठी जनजागृती करतील.
प्लॉग रन दरम्यान मनपा मुख्यालय व झोन परिसरात प्लास्टिक निर्मूलनासाठी आयोजित कार्यक्रमस्थळी मनपाच्या प्लास्टिक संकलन करणाऱ्या गाड्या उपलब्ध राहतील. प्लास्टिक निर्मूलनाबाबत जनजागृती केली जाईल. तसेच प्लास्टिक संकलित करून ते प्रक्रियेसाठी पाठविण्यात येईल.
आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिक मुक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने प्लॉग रनमध्ये सहभागी व्हावे व यापुढे सिंगल यूज प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन अभिजित बांगर यांनी केले आहे.
प्लॉग रनचे असे राहील वेळापत्रक
सकाळी ६.३० ते ७ वाजता - प्लास्टिक गोळा करणे, किट वितरण
सकाळी ७ ते ७.२० वाजता - डिटॉक्स युवर माईंड अँण्ड बॉडी या संकल्पनेवर योगा आणि ध्यान सत्र
सकाळी ७.२० ते ७.३० वाजता - यावेळेत वेळेवर येणारी आवश्यक माहिती दिली जाईल
सकाळी ७.३० ते ९ वाजता - डिटॉक्स अवर नेबरहूड या संकल्पनेवर प्लागिंग सत्र
सकाळी ९ ते ९.३० वाजता - कचऱ्याची विल्हेवाट लावणे, प्लास्टिक निर्मूलनाची प्रतिज्ञा
प्लॉग रनची झोन स्तरावरील ठिकाणे
लक्ष्मी नगर - धंतोली उद्यान, सावरकर नगर चौक
धरमपेठ - अंबाझरी उद्यान, वर्मा ले-आऊट
हनुमान नगर - दुर्गा नगर स्कूल, जवाहन नगर परिसर
धंतोली - सुभाष रोड उद्यान
नेहरूनगर - दत्तात्रय नगर उद्यान
गांधीबाग - गांधीबाग उद्यान मार्के ट
सतरंजीपुरा - शांतिनगर उद्यान, शांतिनगर परिसर
लकडगंज - आंबेडकर उद्यान, आंबेडकर चौक, सेंट्रल एव्हेन्यू
आसी नगर - वैशाली नगर उद्यान
मंगळवारी - मंगळवारी बाजार, जरीपटका मार्केट
मॉलमध्ये कापडी पिशव्या उपलब्ध करणार
प्लास्टिक मुक्तीसाठी शहरातील मॉलमध्ये बंद असलेल्या प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी कापडी व कागदी पिशव्या बचत गटाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यासाठी मॉल व महिला बचत गट यांच्या समन्वय साधला जाईल. अशी माहिती अभिजित बांगर यांनी दिली.
१००७ लोकांवर कारवाई
प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी महापालिकेतर्फे जनजागृती मोहीम राबविली जात आहे. सोबतच बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाते. उपद्रव शोध पथकाने १००७ लोकांवर कारवाई करून ५० लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.