भारत जगाची प्रयोगशाळा व्हावी; पंतप्रधान नरेंद्र मोदी
By आनंद डेकाटे | Published: January 4, 2023 12:56 PM2023-01-04T12:56:57+5:302023-01-04T12:58:49+5:30
१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसला प्रारंभ, पाच दिवसांचा महोत्सव
नागपूर : भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन जगभरासाठी मार्गदर्शक ठरत आहे. या असाधारण कामांची चर्चा आज जगभरात होत आहे. भविष्यात भारतीय प्रयोगशाळेतील संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करणार आहेत, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. विज्ञान क्षेत्रात पुढाकार घेणारेच इतिहास रचत असतात. त्यामुळे देशातील संशोधकांनी तरुणांना प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यात पंतप्रधान व्हर्च्युअली सहभागी झाले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसरात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले, विज्ञान क्षेत्रात भारताने जगातील पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळविले आहे. स्टार्टअपच्या बाबतीत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. २०१५ पर्यंत १३० देशांच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत ८१ व्या स्थानावर होता, तर २०२२ मध्ये भारताने ४० व्या स्थानावर झेप घेतली आहे. येत्या २५ वर्षात भारत विज्ञान क्षेत्रात मोठी भरारी घेईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. भारतीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष विजयलक्ष्मी सक्सेना यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी पोस्ट तिकिटाचे व स्मरणिकेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन कल्पना पांडे यांनी तर महासचिव एस. रामाकृष्ण यांनी आभार मानले.
- काय म्हणाले पंतप्रधान ?
- विज्ञान प्रयोगशाळेतून निघून जमिनीस्तरावर उतरावे.
- महिलांच्या भागीदारीने विज्ञानाचे सक्षमीकरण व्हावे, जी-२०च्या प्रमुख विषयांमध्येही महिलांच्या विकासाच्या मुद्द्याला प्राथमिकता.
- भारताकडे डेटा आणि तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर आहे, या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताला नव्या शिखरावर पोहोचवण्याची क्षमता आहे.
- खेळात भारत नव्या उंचीवर पोहोचला आहे. प्रतिभा विकसित करण्यासाठी गुरू-शिष्य परंपरेचे अस्तित्व व प्रभाव याचे मुख्य कारण आहे.
- विज्ञानाच्या भरवशावर जगाला प्रभावित करता येते, त्यासाठी युवकांना प्रोत्साहित करावे.
- टॅलेंट हंट व हॅकेथॉनच्या माध्यमातून वैज्ञानिक विचार असलेल्या मुलांचा शोध घेता येऊ शकतो. अशा मुलांचे विचार विकसित करता येऊ शकतात.
- नवनवीन आजारांचे संकट येत आहेत. अशावेळी आम्हाला नवीन व्हॅक्सिन तयार करण्यासाठी रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटला प्रोत्साहन द्यावे लागेल.
- भारताच्या आवाहनावर संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ ला आंतरराष्ट्रीय इयर ऑफ मिलेट्स घोषित केले आहे. ही बाब भारतासाठी गौरवास्पद आहे.
- गेल्या आठ वर्षांत देशाने गवर्नेंससह अनेक असाधारण कार्य केले आहे. त्याची जगभरात चर्चा.
वैज्ञानिक हे आधुनिक ऋषी-मुनी- राज्यपाल कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आजचे वैज्ञानिक हे ऋषी-मुनी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या काळात पंतप्रधानांच्या आवाहनावर जगाने योग स्वीकारला असल्याचेही ते म्हणाले.
प्रत्येक क्षेत्रात महिलांचा दबदबा - मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात महिला सशक्तपणे सहभाग नोंदवून आपला ठसा उमटवत आहेत. दबदबा निर्माण करत आहेत. त्यांचे कार्य मार्गदर्शक ठरत आहे. बाल विज्ञान काँग्रेसच्या माध्यमातून मुलांच्या आकांक्षांना प्रोत्साहन मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळेच भारत आज प्रगती करत असल्याचेही ते म्हणाले.
ग्रामीण भागातील जीडीपी वाढावी - गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, आदिवासीबहुल भाग व ग्रामीण भागातील जीडीपी वाढायला हवी. यामुळे देश आत्मनिर्भर होईल आणि आपण पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था उभी करू शकू. निर्यात वाढवून आयात कमी करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
आज भारत विदेशी सॅटेलाईटचे प्रक्षेपण करत आहे : जितेंद्र सिंह
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात देशाने अंतरिक्ष क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. देशात ३८६ विदेशी सॅटेलाईटचे प्रक्षेपण करण्यात आले. यापैकी ३५१ सॅटेलाईट हे मोदी यांच्या कार्यकाळात सोडण्यात आले. अमेरिकेलाही भारत मदत करत आहे.
तंत्रज्ञानाने सर्वांना संधी उपलब्ध - उपमुख्यमंत्री फडणवीस
विज्ञान-तंत्रज्ञान कधीही भेदभाव करत नाही. तो सर्वांना संधी देतो. येथे लिंगाच्या आधारावर कधीच भेदभाव होत नाही. जलवायू परिवर्तनाच्या या काळात सतत विकासाची गरज आहे. आपल्याला आपल्या संसाधनांचा तितकाच वापर करायला हवा, जितकी गरज आहे. येणाऱ्या पिढीसाठी संसाधने शिल्लक ठेवायला हवीत, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.