भारत जगाची ‘फार्मसी’ व्हावे - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 11:28 AM2023-01-23T11:28:32+5:302023-01-23T11:30:43+5:30
७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसचा समाराेप
नागपूर : नुकतेच जगाने काेराेनाचे संकट पाहिले आहे. या परिस्थितीत भारताने अवघ्या काही महिन्यांत स्वत:ची लस विकसित करून देशवासीयांना महामारीविराेधात लढण्याचे बळ दिले आणि १०६ देशातील लाेकांना ३० काेटी डाेसचा पुरवठा केला. आपल्याकडे वैज्ञानिकांची, फार्मसिस्टची शक्ती आहे, केवळ औषधांसाठी लागणारा कच्चा माल येथे निर्माण करण्याची गरज आहे, असे झाले तर भारत हा जगाची फार्मसी हाेईल, असा विश्वास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काॅँग्रेसच्या समाराेपीय समारंभात ते बाेलत हाेते. यावेळी ऑल इंडिया काॅन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनचे सल्लागार डॉ. राजेंद्र काकडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, इंडियन हॉस्पिटल फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष टी. व्ही. नारायणा व वडलामुडी राव, पंकज बेक्टर, आयपीसी आयोजन समितीचे अध्यक्ष अतुल मंडलेकर, असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टिचर्स ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आयोजन समिती सचिव प्रा. मिलिंद उमेकर, आयाेजन सचिव प्रा. प्रकाश इटनकर, समन्वयक डॉ. चंद्रकांत डोईफोडे, संयोजक डॉ. प्रमोद खेडेकर, काेषाध्यक्ष डाॅ. निशिकांत राऊत उपस्थित हाेते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, १०० वर्षांपूर्वी प्लेग आला तेव्हा लसीसाठी ६ वर्षे लागली व ताेपर्यंत लाखाे लाेकांचा मृत्यू झाला हाेता. यावेळी काेराेनाशी लढण्यास अवघ्या वर्षभरात भारताने लस तयार केली आणि लाखाे लाेकांचे प्राण वाचविले. अमेरिकेने कच्चा माल देण्यास बंदी घातली हाेती पण भारताने ऑक्सिक्लाेराेक्वीनचा पुरवठा केल्याने पंतप्रधान माेदींच्या विनंतीमुळे अमेरिकेने बॅन हटविला. संशाेधक, फार्मसिस्टने लस शाेधली आणि विकसितही केली. लस तयार केल्यानंतर भारतासारख्या देशात पुरवठा करणे कठीण हाेते पण देशात एका दिवसात ३ लाख पुरवठा साखळ्या तयार करून काश्मीर ते कन्याकुमारी व पूर्वेपासून पश्चिमेकडे शहरातच नाही तर दुर्गम भागांतील खेडाेपाडी यशस्विपणे पुरवठा केला. ही आपल्या देशाची शक्ती आहे. प्रास्ताविक चंद्रशेखर डोईफोडे यांनी तर संचालन प्रा. मनिष आगलावे व प्रा. नियामत चिमथानावाला यांनी केले.
कच्चा माल व स्वस्त औषधाचे आव्हान
स्वस्त औषधी हे देशापुढचे आव्हान आहे. औषधांच्या किमती सामान्य जनतेच्या अवाक्याबाहेर आहेत. जेनेरिक औषधाने त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न केला पण आणखी माेठा टप्पा गाठायचा आहे. देशात औषधाची निर्मिती माेठ्या प्रमाणात हाेणे गरजेचे आहे. भारताकडे संशाेधक, फार्मासिस्ट यांची शक्ती आहे पण आजही औषधांच्या कच्च्या मालासाठी प्रगत देशांवर अवलंबून राहावे लागते व यात माेठा खर्च हाेताे. त्यावर मात करण्याची गरज फडणवीसांनी व्यक्त केली.
उत्कृष्ट ‘ॲबस्ट्रॅक्ट पोस्टर’ला पुरस्कार
७२ व्या आयपीसीमध्ये देशभरातून ३००० सायंटिफीक पोस्टर आले होते. त्यापैकी २७०० ॲबस्ट्रॅक्ट पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. उत्कृष्ट ८० पोस्टरची तज्ज्ञांच्या चमूद्वारे निवड करण्यात आली. त्यातून ५७ विद्यार्थ्यांना ओरल प्रेझेंटेशनची संधी देण्यात आली. त्यातील उत्कृष्ट दहा सायंटिफिक पोस्टर विजेते विद्यार्थी अभिजित विष्णू पुरी, रूपाली प्रसाद, अपूर्वा बनकर, किर्तीशिखा पी., हेमंत कन्हेरे, आकाश वाघोडे, पूजा तोडके, शांभवी इ. व गोवी पॅबस्टर यांना पुरस्कृत करण्यात आले.
आयपीसी-२०२३ मध्ये ठराव पारीत
- फार्मसी ॲक्ट– १९४८ च्या कलम –४२ चे कठोर पालन व्हावे.
- फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशनची अंमलबजावणी
- औषधीसंदर्भात प्रत्येक निर्णय प्रक्रियेत फार्मसिस्टला सहभागी करून घ्यावे
- स्वतंत्र फार्मसी विभागासह फार्मसी सेवा व प्रशिक्षण संचालनालय स्थापन करावे
- फार्मसिस्ट संवर्गातील पदनिर्मितीचे निकष पीसीआय आणि सरकारने निश्चित करावे.