‘इंडिया’वाल्यांना खरा ‘भारत’ दिसावा!

By admin | Published: March 18, 2017 02:55 AM2017-03-18T02:55:16+5:302017-03-18T02:55:16+5:30

पॉश, झगमगाट असलेल्या ‘इंडिया’तील लोकांना अजूनही खरा ‘भारत’ दिसला नाही. हा सामाजिक भेद आमच्या लक्षात आला.

'India' should see 'true' India! | ‘इंडिया’वाल्यांना खरा ‘भारत’ दिसावा!

‘इंडिया’वाल्यांना खरा ‘भारत’ दिसावा!

Next

मकरंद अनासपुरेंनी व्यक्त केल्या भावना : ‘नाम’ ही लोकसहभागातून चालविलेली चळवळ
गणेश खवसे/अभय लांजेवार   नागपूर
पॉश, झगमगाट असलेल्या ‘इंडिया’तील लोकांना अजूनही खरा ‘भारत’ दिसला नाही. हा सामाजिक भेद आमच्या लक्षात आला. त्यामुळे ही दरी दूर करण्याची खूणगाठ बांधली. त्यातूनच ‘नाम’ फाऊंडेशनने आकार घेतला. ती आता लोकसहभागाची चळवळ झाली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी ‘नाम’ झटत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आम्हाला दिसून आले. हे कार्य ‘नाम’ फाऊंडेशन पुरस्कारासाठी करीत नाही आणि ‘नाम’ ही कुणाची खासगी मालमत्तासुद्धा नाही. काम करणाऱ्या प्रत्येक माणसांची ‘नाम’ आहे. समाज नेहमीच वाईट प्रवृत्तींवर तोंडसुख घेतो. मात्र चांगल्या कामांवरही चर्चा व्हायलाच पाहिजे, असे मत हास्यअभिनेता मकरंद अनासपुरे याने व्यक्त केले.

मकरंद हा नागपुरात आला असता ‘नाम’ फाऊंडेशनबाबतच्या कामाची माहिती जाणून घेण्यासाठी भेट घेतली असता त्याने दिलखुलास चर्चा केली. अन्नदात्यापासूनच सुरू झालेली चर्चा अन्नदात्यांवरच संपली. कुही तालुक्यातील टाकळी येथे ‘नाम’च्या वतीने आकाराला आलेले तलावाचे काम आम्ही बघितले म्हणताच मकरंदच्या चेहऱ्यावर आनंद अभिव्यक्त झाला. ‘कसं वाटतय... स्पॉट बघितला का, शेतकऱ्यांना फायदा झाला का...’ अशी लागलीच आपुलकीची विचारणाही सुरू झाली. यवतमाळातील घाटंजीला काम सुरू आहे. वर्धा, अमरावतीला लवकरच काम सुरू करणार आहोत आणि मी सध्या पोकलॅन्ड मिळविण्याच्या मागे आहे, कुणी असेल तर सांगा असेही सांगण्यास मकरंद विसरला नाही.
चंदेरी दुनियेत काम करताना ‘नाम’बाबत कसे सुचले या प्रश्नावर मकरंद म्हणाला, आमच्या क्षेत्रात खूप ग्लॅमर आहे. खूप पार्ट्या चालातात, समारंभांचा थाट असतो. सर्वत्र झगमगाट असतो. परंतु मला हे सर्व किळसवाणं वाटतंय. आतापर्यंत माझ्या कलेला रसिक, प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. लोकांनी जे दिले ते या माध्यमातून परत करायचे आहे. आपण सोशल मीडियावर गप्पा मारण्यात वस्ताद आहोत. प्रत्यक्षात काम करण्यात कमी. म्हणून ठरवले कुणावर टीका करण्यापेक्षा, बोलण्यापेक्षा आपण स्वत: उतरायचे. यादरम्यान ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ आणि दुष्काळ परिस्थितीवर आधारित शेतकऱ्यांच्या समस्येला हात घालणाऱ्या चित्रपटात भूमिका केल्या. नाना पाटेकर यांच्यामुळे इंटरेस्ट वाढला. गंभीरतनेने लक्ष दिले तर ही एक चांगली मोहीम होऊ शकेल, असा विश्वास आम्हाला वाटला. इंडियातील लोकांना भारतातील समस्याच माहीत नाही, असाही सामाजिक भेद आमच्या ध्यानात आला. पक्की खूणगाठ बांधली. त्यातून ‘नाम’ आकाराला आले. या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लोकसहभागातून चळवळ राबविण्यात येत आहे, असेही मकरंदने सांगितले.

मी उपवास करणार!
अन्नदात्यांसाठी १९ मार्चला असंख्य नागरिक उपवास करणार आहेत. अन्नदात्यांच्या संघर्षमयी आयुष्यात खंबीरतेने सोबतीला आहोत अशीच हाक सर्वत्र ऐकू येत आहे. याबाबत काय वाटते असे विचारताच ‘होय, मला ही बाब कळली. मी सुद्धा दिवसभर उपवास करणार आहे’ असा संकल्प मकरंदने बोलून दाखविला. सर्वच संपलेले नाही, विझलेसुद्धा नाही, असा विश्वास आणि ऊर्जा शेतकऱ्यांमध्ये तुम्ही - आम्ही साऱ्यांनीच देण्याची गरज असल्याचीही बाब व्यक्त केली.

मला देवत्व नकोय
कोकण, सिंधुदुर्ग, पश्विम महाराष्ट्र आणि विदर्भात कामाचा आवाका वाढवलेला आहे. लोकसहभागातून रस्ते, तलावाचे खोलीकरण, बंधारे आदी महत्त्वपूर्ण कामांचा धुमधडाका सुरू आहे. जिथे वाळवंट होते; तिथे पिके डोलत आहेत. फळांच्या बागा फुलत आहेत. लातूरनजीक पाखरसावंगी या गावात लोकसहभागातून १२५ रस्ते बांधले. लोकार्पणासाठी सारखा आग्रह होता. मुद्दाम समारंभ टाळतो. काम फत्ते झाले की आम्हास आनंद मिळतो. आम्हाला देवत्व नकोय. जिथे काम सुरू करायचे आहे तिथे जात असतो कारण तिथे काही घडलेले नसते. काम पूर्णत्वाला आले तिथे त्या कामाला लोकांनीच पुढे रेटायचे. आम्हाला यातून काही मिळावे, ही अपेक्षा नाही. सध्याचे काम हे ज्योत असेल तर उद्या त्याची मशाल होईल. त्यासाठी लोकांनी एकत्रित येणे अपरिहार्य आहे, हे सांगण्यासही मकरंद विसरला नाही.

Web Title: 'India' should see 'true' India!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.