अंतराळात क्षेपणास्त्र उडविण्यात भारतही 'सुपर पॉवर' : यू. राजा बाबू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 12:44 AM2020-03-01T00:44:18+5:302020-03-01T00:48:06+5:30
भारताकडून गेल्या वर्षी २७ मार्चला ‘शक्ती मिशन’ या नावाने प्रक्षेपित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘अॅण्टी सॅटेलाईट मिसाईल’ची यशस्वी चाचणी करण्यात आली. हे एक केवळ मिशन नव्हते, तर यातून जगाला अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारतही सुपर पॉवर असल्याचा संदेशही देण्यात आला,
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताकडून गेल्या वर्षी २७ मार्चला ‘शक्ती मिशन’ या नावाने प्रक्षेपित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘अॅण्टी सॅटेलाईट मिसाईल’ची यशस्वी चाचणी करण्यात आली. हे एक केवळ मिशन नव्हते, तर यातून जगाला अवकाश तंत्रज्ञानामध्ये भारतही सुपर पॉवर असल्याचा संदेशही देण्यात आला, असे विचार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) हैदराबादचे कार्यक्रम संचालक यू. राजा बाबू यांनी व्यक्त केले.
विज्ञान भारती, विदर्भ प्रदेश मंडळाच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण अंबाझरी रोडवरील बी.आर.ए. मुंडले हॉल येथे विज्ञान संस्कृती संगम व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य वक्ता म्हणून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारतीचे अध्यक्ष व नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे, सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर, मॉईलचे अध्यक्ष व विज्ञान भारतीचे सल्लागार मुकुंद चौधरी उपस्थित होते.
'तंत्रज्ञानात बदल: क्षेपणास्त्र आणि अंतराळ संरक्षण' या विषयावर यू. राजा बाबू बोलत होते. ते म्हणाले, ‘मिशन शक्ती’ला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारताच्यावतीने विकसित केले. यापूर्वी रशिया, चीन आणि अमेरिका या देशांनाच अंतराळ तंत्रज्ञानामध्ये सुपर पॉवर मानले जात होते. पण आता भारतानेही स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले आहे, असेही ते म्हणाले. संचालन दांडेकर यांनी केले. आभार विज्ञान भारती, विदर्भ प्रदेश विभागाचे उपाध्यक्ष डॉ. शैलेश खेडकर यांनी मानले.