‘तो’ सायकलवर निघालाय भारत भ्रमणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:49 AM2019-05-17T10:49:47+5:302019-05-17T10:51:34+5:30
हरियाणा येथील चंद्रप्रकाश यादव हा २२ वर्षीय तरुण एका ध्येयाने प्रेरित होऊन सायकलवर भारत भ्रमणाला निघाला आहे.
सैयद मोबीन।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणाव्या तशा प्रत्येकाला एखाद्या गोष्टीचे पॅशन असते. मग असे ध्येयवेडे लोक येणाऱ्या कुठल्याही अडचणींची पर्वा न करता आपल्या मनातील ध्येयपूर्ती करण्याच्या प्रयत्नाला लागतात. हरियाणा येथील चंद्रप्रकाश यादव हा २२ वर्षीय तरुण एका ध्येयाने प्रेरित होऊन सायकलवर भारत भ्रमणाला निघाला आहे. देशात एकता, शांतता व बंधुभाव नांदावा, हा संदेश घेऊन हा तरुण सायकलवर हरियाणा ते कन्याकुमारी ते दिल्ली या प्रवासाला निघाला आहे.
हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील निगानी यवास या गावचा चंद्रप्रकाश जयपाल यादव हा तरुण १ फेब्रुवारीला आपल्या गावावरून निघाला. हरियाणा-कन्याकुमारी ते दिल्ली हे एकूण अंतर ७००० किलोमीटर आहे. आता हा तरुण परतीच्या प्रवासाला लागला असून यादरम्यान नागपूरला आलेल्या चंद्रप्रकाशने लोकमतशी संवाद साधला. हरियाणापासून सुरू झालेल्या या प्रवासात चंद्रप्रकाशने राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा ही राज्ये पादाक्रांत केली व गुरुवारी नागपूर गाठले. यामध्ये त्याने ६००० किलोमीटरचे अंतर पूर्ण केले आहे. यानंतर येत्या १५ दिवसात मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश होत दिल्लीला हे अभियान संपविणार आहे. या संपूर्ण यात्रेदरम्यान विविध राज्यातील नागरिकांकडून प्रचंड सहकार्य मिळाल्याचे त्याने सांगितले. ही सायकल यात्रा पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना समर्पित असल्याची भावना त्याने व्यक्त केली. देशात एकता, शांतता व बंधुभाव नांदावा, मुलींना वाचवा-मुलींना शिकवा हा संदेशही प्रवासात देत असल्याचे त्याने सांगितले.
दररोज १०० किमी प्रवास
चंद्रप्रकाश यांनी सांगितले, दररोज ८० ते १०० किमीचे अंतर कापण्याचे निश्चित केले आहे. सकाळी ६ वाजता प्रवास सुरू करून १२ वाजतापर्यंत चालायचे. त्यानंतर कुठेतरी थांबून काही तास आराम करायचा आणि पुन्हा प्रवास सुरू करायचा. रात्री आराम करून सकाळी पुन्हा नव्या उत्साहाने पुढच्या प्रवासाला लागायचे, असा हा नित्यक्रम. आतापर्यंत ६००० किमीचे अंतर पूर्ण केले असून उरलेल्या १००० किमीचा प्रवास येत्या १५ दिवसात पूर्ण करणार आहेत.
आईला यात्रेबाबत फोनवर सांगितले
चंद्रप्रकाश शेतकऱ्याचा मुलगा असून बी.एस्सी. द्वितीय वर्षाचा अभ्यास करीत आहे. भारत यात्रेला निघाला तेव्हा आईला सांगण्याची हिंमत नव्हती. आई काळजीपोटी मनाई करेल, अशी भीती होती. त्यामुळे कुणाला न सांगता घरून निघालो व २०० किमीचा प्रवास करून राजस्थानला पोहचल्यानंतर आईला फोन करून प्रवासाबाबत कळविल्याचे चंद्रप्रकाशने सांगितले. हे एकताच आई रडायला लागली व परत येण्याचा आग्रह केला. मात्र आपण निर्धार केला होता. त्यामुळे परत फिरण्यापेक्षा पुढच्या प्रवासाला लागल्याचे त्याने स्पष्ट केले.