‘ट्रम्प टॅरिफ’मुळे भारत-अमेरिकेच्या ‘मिशन ५००’ चा मार्ग बिकट, घोषणेच्या दोनच महिन्यांत अडचण

By योगेश पांडे | Updated: April 4, 2025 05:55 IST2025-04-04T05:54:43+5:302025-04-04T05:55:26+5:30

Trump Tariffs: सद्यस्थितीत जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ची चर्चा सुरू असून विविध शेअर बाजारांना त्याचा फटका बसला आहे. मात्र या ‘टॅरिफ कार्ड’मुळे वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने वाढीस लागली आहेत.

India-US 'Mission 500' faces tough road due to 'Trump Tariffs', problems within two months of announcement | ‘ट्रम्प टॅरिफ’मुळे भारत-अमेरिकेच्या ‘मिशन ५००’ चा मार्ग बिकट, घोषणेच्या दोनच महिन्यांत अडचण

‘ट्रम्प टॅरिफ’मुळे भारत-अमेरिकेच्या ‘मिशन ५००’ चा मार्ग बिकट, घोषणेच्या दोनच महिन्यांत अडचण

- योगेश पांडे 
नागपूर  - सद्यस्थितीत जगभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ची चर्चा सुरू असून विविध शेअर बाजारांना त्याचा फटका बसला आहे. मात्र या ‘टॅरिफ कार्ड’मुळे वाणिज्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने वाढीस लागली आहेत. जर यातून मार्ग निघाला नाही तर दोनच महिन्यांअगोदर भारत व अमेरिकेने सोबत ठरविलेल्या ‘मिशन ५००’चा मार्ग बिकट होताना दिसत असून २०३० पर्यंत दोन्ही देशांतील व्यापार पाचशे बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे स्वप्न अडचणीत येईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांच्या उपस्थितीत १२ व १३ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टन डी. सी. येथे वाणिज्य क्षेत्रातील तज्ज्ञ व अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. वस्तू आणि सेवा क्षेत्रातील द्विपक्षीय व्यापार मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांकडून एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारण्याचा संकल्प करण्यात आला होता. बाजारपेठेतील व्यापार वाढविणे, पुरवठा साखळी मजबूत करणे आणि शुल्कासंबंधींचे अडथळे कमी करण्यासाठी दोन्ही देशांत सखोल चर्चा झाली होती. पंतप्रधान व ट्रम्प यांनी द्विपक्षीय व्यापारासाठी ‘मिशन ५००’ची घोषणा केली. या माध्यमातून २०३० सालापर्यंत एकूण द्विपक्षीय व्यापाराची उलाढाल दुपटीहून अधिक वाढवत ५०० बिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करार प्रस्थापित करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये बैठकांचे सत्रदेखील सुरू होते. मात्र अवघ्या दोन महिन्यांतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे या ‘मिशन ५००’ समोर संकट उभे ठाकले आहे.

पाच वर्षांतील अमेरिकेशी ‘सरप्लस’ व्यापार
मागील अनेक वर्षांपासून भारताचा अमेरिकेसोबत विविध क्षेत्रांत व्यापार सुरू आहे. पाच वर्षांतील आकडेवारीकडे लक्ष टाकले तर चीनपेक्षा अमेरिकेशी झालेला व्यापार भारताला फायदेशीर ठरला आहे. अमेरिकेसोबत ‘गुड्स ट्रेड’मध्ये भारताला फायदाच होत आला. २०१९-२० मध्ये हा आकडा १७.२६८ बिलियन डॉलर्स इतका होता. त्यानंतर त्यात वाढ होत गेली व २०२३-२४ चा भारताचा अमेरिकेशी ‘ट्रेड बॅलेन्स’ ३५.३१९ बिलियन डॉलर्स इतका होता. मात्र आता ‘ट्रम्प टॅरिफ’नंतर ही वाढ कायम ठेवण्याचे मोठे आव्हान केंद्र सरकारसमोर असेल.

अमेरिकेतून पाच वर्षांत झालेली आयात
वर्ष : आयात मूल्य (बिलियन डॉलर्समध्ये)
२०२० : २६.९०९
२०२१ : ४१.३१६
२०२२ : ५१.३०८
२०२३ : ४४.४१०
२०२४ : ४२.८२२

अमेरिकेत पाच सर्वाधिक निर्यात झालेल्या वस्तू (२०२४)
कमोडिटी : निर्यात मूल्य (बिलियन डॉलर्समध्ये) : सरासरी शुल्क
इलेक्ट्रिकल मशिनरी : १२.५७९ : १.२० टक्के
मोती, ज्वेलरी : ९.२८७ : २.१० टक्के
फार्मा उत्पादने : ८.८६३ : ०.२० टक्के
न्यूक्लिअर रिॲक्टर्स, बॉयलर्स : ६.५६८ : १.३० टक्के
खनिज इंधन, तेल : ४.४१६ : ०.५० टक्के
टेक्सटाइल : ९.६ : -

Web Title: India-US 'Mission 500' faces tough road due to 'Trump Tariffs', problems within two months of announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.