भारत भविष्यात विज्ञान क्षेत्राची महासत्ता बनेल; नोबेल विजेत्या प्रा. ॲडा योनाथ यांनी व्यक्त केला विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2023 08:04 PM2023-01-06T20:04:42+5:302023-01-06T20:06:09+5:30
Nagpur News सध्या विकसनशील देशात गणना होत असली तरी भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आणि एक दिवस हा देश विज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता बनेल, असा विश्वास नोबेल पुरस्कार विजेत्या प्रा. ॲडा योनाथ यांनी व्यक्त केला.
नागपूर : भारत हा मैत्रीपूर्ण देश असून या देशासोबत माझे फार जुने संबंध आहेत. सध्या विकसनशील देशात गणना होत असली तरी भारताने विज्ञानाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आणि एक दिवस हा देश विज्ञानाच्या क्षेत्रात महासत्ता बनेल, असा विश्वास नोबेल पुरस्कार विजेत्या प्रा. ॲडा योनाथ यांनी व्यक्त केला.
१०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या चौथ्या दिवशी प्रा. ॲडा योनाथ नागपुरात आल्या असता त्यांनी राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात इंडियन सायन्स ॲण्ड साेसायटीच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. भारतात मी अनेकदा आली आहे. दिल्ली येथे संशोधन परिषदांना आली आहे. नागपुरात येण्याची संधी पहिल्यांदा मिळाली असून याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. नोबेल पुरस्कारासाठी नाव जाहीर झाल्यावर कसा अनुभव होता. याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, कुणी तरी आपली थट्टा करत आहे, असे वाटले. हा गमतीदार किस्सा त्यांनी रंगवून सांगितला. भारतीय भाैतिकशास्त्रज्ञ दिवंगत प्रा. जी. एन. रामचंद्रन यांना आपल्यापूर्वी नाेबेल मिळायला हवे हाेते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विज्ञानाकडून लोकांना फार अपेक्षा आहेत. यात फार आवड असल्याशिवाय संशोधन करू शकत नाही. आपले संशोधन जसजसे कठीण होत जाईल, तसे आपले यश वाढत जाईल. १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसची संकल्पना ही फार सुंदर असून मला खूप आनंद होत असल्याचे प्रा. ॲडा योनाथ म्हणाल्या.