भारत परत विश्वगुरू बनणार : राजयोगी ब्रह्मकुमार करुणाभाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:08 AM2019-06-27T00:08:57+5:302019-06-27T00:10:20+5:30
भारताची संस्कृती व जीवनपद्धती पाहून विदेशी लोकदेखील प्रभावित झाले आहेत. देशाच्या संस्कृतीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्रह्मकुमारीज् परिवारातील १० लाखांहून अधिक लोक आपल्या जीवनातून भारतीय संस्कृती दाखवत आहेत. भारत परत एकदा विश्वगुरू बनण्यास सज्ज आहे व यात सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे मत ब्रह्मकुमारीज्च्या मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बीके करुणाभाई यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारीज्च्या जामठास्थित विश्व शांती सरोवर येथे बुधवारी नवीन भारताच्या स्थापनेत मीडियाचे योगदान या विषयांतर्गत मीडिया महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारताची संस्कृती व जीवनपद्धती पाहून विदेशी लोकदेखील प्रभावित झाले आहेत. देशाच्या संस्कृतीचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. ब्रह्मकुमारीज् परिवारातील १० लाखांहून अधिक लोक आपल्या जीवनातून भारतीय संस्कृती दाखवत आहेत. भारत परत एकदा विश्वगुरू बनण्यास सज्ज आहे व यात सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असे मत ब्रह्मकुमारीज्च्या मीडिया विंगचे अध्यक्ष राजयोगी बीके करुणाभाई यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारीज्च्या जामठास्थित विश्व शांती सरोवर येथे बुधवारी नवीन भारताच्या स्थापनेत मीडियाचे योगदान या विषयांतर्गत मीडिया महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनानंतर ते बोलत होते.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाची सहयोगी संस्था राजयोग एज्युकेशन अॅन्ड रिसर्च फाऊंडेशनच्या मीडिया विभागातर्फे ओमशांति मीडिया या पाक्षिकाला २१ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य वक्ता म्हणून साधना पथ साप्ताहिकाचे माजी संपादक बी.के.अनुज, ओम शांती मीडियाचे चीफ एडिटर बीके.गंगाधर, धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ.बबन नाखले प्रामुख्याने उपस्थित होते. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एक आहे. विश्व हेच एक कुटुंब आहे, ही संकल्पना ब्रह्माकुमारीज् १९३६ पासून मांडत आहे. भारत अविनाशी खंड आहे. भारतीय संस्कृतीच्या आधारावरच हे म्हणण्यात येते की भारत होता, आहे आणि असेल. भारतीय शिक्षण पद्धती ही गुरुकुल स्वरूपाची राहिली आहे. वर्तमान स्थितीतील शिक्षण पद्धतीत अनेक दोष आहेत. शरीर हेच मंदिर आहे हे कुणीच शिकवत नाही, असे बीके करुणाभाई म्हणाले.
पत्रकारिता आणि आध्यात्मिकता वेगवेगळे राहू शकत नाही. आपल्याकडे जगातील प्रत्येक गोष्ट आहे. मात्र मनातील वृत्ती बदलणे आणि मनातील वैरभावनेला दूर करून शुद्ध करणे हे शक्य झालेले नाही. जर आपल्या मनात जगाच्या कल्याणाची भावना असेल तर लेखनीतदेखील तशीच शक्ती प्राप्त होईल, असे प्रतिपादन बी.के.गंगाधर यांनी केले. नवीन भारताच्या निर्माणात मीडियाचे मौलिक योगदान आहे. कायदे आपण बदलू शकत नाही, मात्र त्याला नैतिकतेमध्ये बदलू शकतो. केवळ परमात्माच आपल्याला सुरक्षा देऊ शकतो, असे मत अनुजभाई यांनी व्यक्त केले.
नागपूर सेवाकेंद्राच्या संचालिका राजयोगिनी रजनी दीदी व डॉ.बबन नाखले यांनीदेखील मत मांडले. बीके रक्षा दीदी यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन बीके वर्षाबहन व बीके अनुजभाई यांनी केले. बीके मनीषा दीदी यांनी राजयोगाची अनुभूती सर्वांना करवून दिली. बीके प्रेमप्रकाश यांनी आभार मानले.