भारतात यावर्षी ९० टक्के पाऊस पडेल? अल-निनोचा प्रभाव ऑगस्टनंतरच जाणवणार
By निशांत वानखेडे | Published: April 5, 2023 08:00 AM2023-04-05T08:00:00+5:302023-04-05T08:00:06+5:30
Nagpur News यंदाही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग व आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केला आहे. अल-निनाे असूनही यंदा मान्सूनचा ९० टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : प्रशांत महासागरात ‘अल-निनाे’ सक्रिय झाल्याचे हवामान वैज्ञानिकांनी स्पष्ट केल्याने भारतात मान्सूनच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र चिंता करण्यासारखी स्थिती नसून यंदाही चांगला पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभाग व आंतरराष्ट्रीय संस्थांनी व्यक्त केला आहे. अल-निनाे असूनही यंदा मान्सूनचा ९० टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेले ३ वर्ष ला-निनाेचे हाेते परंतू २०२३ हे अल-निनाेचे वर्ष राहणार असून प्रशांत महासागरात ताे सक्रियही झाला आहे. मात्र मे २०२३ पर्यंत अल-निनाेची स्थिती न्यूट्रल असेल. जून, जुलैमध्ये ताे साधारण असेल. ऑगस्टमध्ये ताे थाेडा सक्रिय हाेईल. त्यानंतर ताे अधिक सशक्त झाला तरच पावसावर प्रभाव पडेल. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अभ्यासानुसार भारतात जून, जुलैमध्ये चांगला पाऊस पडेल. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस हाेईल, असा अंदाज आहे. मात्र भारतीय हवामान खात्याने दिलासादायक शक्यता व्यक्त केली आहे. अल-निनाे ऑगस्टनंतरच सक्रिय हाेईल. भारतात नैऋत्य मान्सूनचा प्रभाव जुलैपर्यंत अधिक असताे. मात्र भारताला बंगालची खाडी व अरबी समुद्रातील माेसमी वाऱ्यांचा फायदा मिळताे. त्यामुळे यंदाही ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
खरंच अल-निनाेचा प्रभाव असताे का?
हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चाेपणे यांच्या मते भारतीय मान्सूनवर अल-निनाेचा प्रभाव त्याच्या तीव्रतेवर अवलंबून असताे. त्याचा प्रभाव एक वर्ष किंवा अधिक जाणवताे. अशक्त, मध्यम आणि सशक्त अशा स्वरुपात अल-निनाेची सक्रियता असते. १९५० पासून २० वेळा अल-निनाे वर्ष आले. त्यांचे अवलाेकन केले असता या वर्षात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला हाेता. ५ तीव्र अल-निनाे वर्षात अत्यंत कमी पाऊस पडला व दुष्काळाचा सामना करावा लागला. इतर वर्षात ताे मध्यम स्वरुपाचा हाेता पण दुष्काळी स्थिती नव्हती. अलीकडे २००९, २०१४, २०१५ व २०१८ या अल-निनाे सक्रिय असलेल्या वर्षात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला, मात्र ताे समाधानकारक हाेता.
अल-निनाे, ला-निनाे म्हणजे काय?
प्रशांत महासागराचे तापमान कमी झाले की ला-निनाे आणि वाढले की अल-निनाे हाेय. तापमान वाढले की पूर्वेकडे म्हणजे अमेरिकेच्या पेरू, इक्वेडाेरकडे कमी दाबाचा पट्टा तयार हाेताे. याउलट पश्चिमेकडे हिंद महासागरात जास्त दाबाचा पट्टा तयार हाेताे. वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. त्यामुळे अल-निनाेच्या प्रभावाने बाष्पाने भरलेले ढग पूर्वेकडे वाहतात व मान्सूनचा जाेर वाढताे तर हिंद महासागराकडे मान्सूनचा जाेर मंदावताे.