पीओके घेण्यासाठी भारताला सुनियोजित अस्त्रांचा वापर करावा लागेल : कॅप्टन आलोक बन्सल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 10:43 PM2019-11-16T22:43:22+5:302019-11-16T22:52:07+5:30
पीओके घेणे मुळीच कठीण नाही. मात्र, ते घेण्यासाठी शस्त्रांऐवजी सुनियोजित अस्त्रांचा वापर करण्यासाठीची आयडॉलॉजी भारताला अंगीकारावी लागेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९७१च्या भारत-पाक युद्धात भारताने पाक अधिकृत काश्मीरचा ८०४ किलो मीटर प्रदेश भारतात सामील केला. आता तर भारताची राजकीय इच्छाशक्तीही प्रबळ आहे. त्यामुळे, पीओके घेणे मुळीच कठीण नाही. मात्र, ते घेण्यासाठी शस्त्रांऐवजी सुनियोजित अस्त्रांचा वापर करण्यासाठीची आयडॉलॉजी भारताला अंगीकारावी लागेल. त्या दृष्टीने थिंकटँकने विचार करणे अभिप्रेत असल्याचे चिंतन सेवानिवृत्त नौसैनिक व नवी दिल्ली येथील इंडिया फाऊंडेशन व सेंटर फॉर सिक्युरिटी अॅण्ड स्ट्रॅटेजीचे संचालक कॅप्टन आलोक बन्सल यांनी आज येथे मांडले.
जम्मू काश्मीर स्टडी सेंटरच्या नागपूर चॅप्टरद्वारे शनिवारी पर्सिस्टंटच्या कवि कुलगुरू कालिदास सभागृहात ‘जम्मू काश्मीर आणि लद्दाखची परिवर्तनशील गतिशीलता, आव्हाने आणि संधी’ या विषयावर बन्सल यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, त्यांनी जम्मू काश्मीर, लद्दाखचा इतिहास, पाकिस्तान आणि चीनसोबतची धोरणे, दोन्ही देशांसोबत असलेल्या सीमावादाची तफावत आणि हे प्रश्न निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरलेली राजकीय इच्छाशक्ती आदींवर दाखल्यानिशी विश्लेषणात्मक चिंतन सादर केले. व्यासपीठावर सेंटरच्या नागपूर चॅप्टरच्या अध्यक्ष मीरा खडक्कार व सचिव अभिनंदन पळसापुरे उपस्थित होते.
ज्याप्रमाणे पाकिस्तान काश्मीरमधील फुटीरतावादी हुरियतच्या नेत्यांना विशेष आयोजनावर निमंत्रित करते आणि त्यांच्यात सांस्कृतिक नात्याचे बीज पेरते, तसे धोरण भारताने कधीच अवलंबिले नाही. पाकिस्तानला अपेक्षित सुन्नी इस्लाम आणि गिलगिट-बाल्टिस्तानचा मिश्रित इस्लाम अत्यंत वेगळा आहे. पाकिस्तानी संस्कृतीशी कोणत्याच अर्थाने त्यांची सरमिसळ होत नाही. उलट, त्यांची संस्कृती भारतीय हिंदू आणि लद्दाखशी निगडित आहे. संपूर्ण गिलगिट-बाल्टिस्तानी भारतधार्जिणे त्याच कारणामुळे आहेत आणि ते सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर बातम्यांतून दिसूनही येते. ते सांस्कृतिक आदानप्रदान करण्याच्या हेतूने आणि तेथील नेत्यांना भारताने कधीच आमंत्रित करून, त्यांना सहानुभूती दिली नाही. तेथील शिया कम्युनिटीला संरक्षणाचा आधार देऊन, त्यांच्या संस्कृतीचे व भाषांचे संवर्धन करण्याच्या हेतूने भारताने विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे.
त्यांना तो आधार भारताकडूनच अपेक्षित आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या रॅडिकल इस्लामिक आयडॉलॉजीला नामोहरम करण्यासाठी परस्परविरोधी रॅडिकल आयडॉलॉजी अंमलात आणून तेथील नागरिकांना आपलेसे करावे लागणार असल्याचे बन्सल यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन अंकिता देशकर यांनी केले. तर आभार सागर मिटकरी यांनी मानले.
युद्ध अशक्य
भारत आणि पाकिस्तान दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्र आहेत. त्यामुळे, दोन्ही देशांमध्ये आता थेट युद्ध अशक्य आहे. मात्र, अशातही युद्ध झालेच तर त्यात चीन कधीच पडणार नाही. त्याची, कारणे वेगळी आहेत. चीन स्वत:च सीपीईसीमध्ये गुंतवणूक करून त्रस्त आहे. मात्र, भारत आणि चीनमध्ये युद्ध झालेच तर पाकिस्तान मात्र चीनकडून भारताविरोधात उभा होईल. तरी देखील, या सगळ्या निश्चित गोष्टी नसल्याचे आलोक बन्सल म्हणाले.
शारदा पीठासाठी भारताने प्रयत्न करावे
ज्याप्रमाणे पाकिस्तानने करतारपूर मोकळे केले. त्याचप्रमाणे मिरपूर येथील शारदा पीठच्या दर्शनासाठी ते मोकळे करण्याचा विचार करत आहे. भारताने ही संधी साधणे गरजेचे आहे. त्यामुळे, गिलगीट-बाल्टिस्तानमधील नागरिकांशी संवाद साधने सोपे होणार असल्याचेही बन्सल म्हणाले.