ज्ञान केंद्रस्थानी असेल तरच भारत जगात आघाडीवर राहिल, नीती आयाेगाचे सदस्य विजयकुमार सारस्वत
By निशांत वानखेडे | Published: September 15, 2024 07:32 PM2024-09-15T19:32:12+5:302024-09-15T19:32:22+5:30
व्हीएनआयटीचा २२ वा दीक्षांत सोहळा
नागपूर: एकविसावे शतक डेटा अर्थशास्त्राचे आहे आणि अर्थातच आपल्या देशाचे आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी सोहळ्याकडे वाटचाल करताना भारतात नॅनो तंत्रज्ञान, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, सेमीकंडक्टर यासारख्या क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती होत आहे. मात्र ज्ञान केंद्रस्थानी असायला हवे, तरच भारत जगात आघाडीवर राहिल, असे मत माजी डीआरडीओ सचिव व नीती आयोग सदस्य डॉ.विजयकुमार सारस्वत यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय अभियंता दिनाचे औचित्य साधून व्हीएनआयटीचा २२ वा दीक्षांत सोहळा रविवारी व्हीएनआयटी परिसरात आयोजित करण्यात आला. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या प्रशासकीय मंडळाचे संचालक एम.मदन गोपाल, व्हीएनआयटीचे संंचालक प्रेमलाल पटेल उपस्थित होते. डाॅ. सारस्वत म्हणाले, जुन्या काळातील संशोधकांच्या तुलनेने आजच्या काळातील संशोधक, शास्त्रज्ञांपुढील आव्हाने फार वेगळी आहे. आज एखाद्या विषयात केवळ तज्ञ होऊन भागणार नाही तर विविध विषयातील परस्परसंबंधांना ओळखून त्यांना प्रयोगात आणणे काळाची गरज आहे. समाजातील, देशातील व्यावहारिक समस्या सोडविण्यासाठी विज्ञानाच्या विविध शाखांची जोड घालण्याची आवश्यकता आहे. भारताने प्रगती करताना स्वच्छ इंधनाला प्राथमिकता दिली पाहिजे. शाश्वत औद्योगिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हवामानातील बदलांवर उपाययोजना करता येईल. रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यांच्या मदतीने भारताचे शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संचालन डॉ. मैथिली पैकने आणि डॉ. अभिषेक बॅनर्जी यांनी केले. आभार कुलसचिव एस.आर.साठे यांनी मानले.
रोहित चौहान सर विश्वेश्वरय्या सुवर्ण पदकाने सन्मानित
अभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी रोहित रमेश चौहान याला बी. टेक. प्रोग्रामच्या सर्व विद्यार्थ्यांमधील उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल २०२४ चे प्रतिष्ठित "सर विश्वेश्वरय्या सुवर्ण पदक" देऊन सम्मानित करण्यात आले. इतरही गुणवंत विद्यार्थ्यांना पदकाने सन्मानित करण्यात आले. यासह १२२५ पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात ९५ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, २३९ एम.टेक., ६० एम.एससी., ७६५ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, ७३ बॅचलर ऑफ आर्किटेक्ट पदवींचा समावेश होता.