Indian Air Strike on Pakistan; ‘नाऊ द जोश इज हाय’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 10:37 AM2019-02-27T10:37:26+5:302019-02-27T10:39:19+5:30
भारतीय वायुसेनेने ‘सर्जिकल स्ट्राईक-२’च्या माध्यमातून जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केल्यानंतर संरक्षण दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीदेखील कारवाईचे स्वागत केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय वायुसेनेने ‘सर्जिकल स्ट्राईक-२’च्या माध्यमातून जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केल्यानंतर संरक्षण दलातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीदेखील कारवाईचे स्वागत केले आहे. भारतीय वायुदलाने परत एकदा आपली क्षमता दाखवून दिली असून खºया अर्थाने भारताकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्यांना धडा शिकविल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून उमटली. नागपुरातील काही सेवानिवृत्त अधिकाºयांच्या भावना ‘लोकमत’ने जाणून घेतल्या व प्रत्येकाच्या बोलण्यातून ‘नाऊ द जोश इज हाय’ असाच सूर निघाला.
तयारीनिशी ‘परफेक्ट’ कारवाई
भारताकडून दहशतवादी तळांवर कारवाई अपेक्षितच होती. भारतीय वायुदलाने केलेली कारवाई ही ‘परफेक्ट’ अशीच म्हणावी लागेल. या हल्ल्यानंतर लगेच पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मदतीसाठी धावेल असे वाटत होते. मात्र आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर अगोदरच त्यांची कोंडी केलेली आहे. पाकिस्तानने ‘प्रॉक्सी वॉर’च्या माध्यमातून भारताविरोधात कारवाया केल्या. त्यामुळे या ‘स्ट्राईक’नंतर पाकिस्तानला बोलण्यासाठी फारशी जागाच राहिलेली नाही. सर्वच पातळ््यांवर पाकिस्तानला एकटे पाडण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्व आवश्यक तयारी अगोदरच पूर्ण झाली असल्याचे चित्र आहे. तिन्ही संरक्षण दलेदेखील कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी सिद्धच आहेत.
-रवींद्र थोडगे, लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त)
सरकारने असेच स्वातंत्र्य द्यावे
भारतीय वायुदलाने केलेल्या कामगिरीला अद्वितीय असेच म्हणावे लागले. पाकिस्तान व दहशतवाद्यांना भारताची नेमकी क्षमता समजली असेल. शत्रूच्या घरात घुसून मारणे याला नियोजन, हिंमत व आत्मविश्वास लागतो. सोबतच पुलवामा येथे आपले जवान शहीद झाल्यानंतर केंद्र सरकारनेदेखील सैन्याला स्वातंत्र्य दिले होते. त्याचा परिणाम या ‘स्ट्राईक’च्या माध्यमातून दिसून आला. तसे पाहिले तर १४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी हा कालावधी फारच कमी होता. मात्र त्यातही अतिशय योग्य नियोजन करून कारवाई करण्यात आली. आता नक्कीच पाकची घाबरगुंडी उडाली आहे. जर पाकिस्तानने पुढेदेखील कुरापती सुरूच ठेवल्या तर त्यांना याच भाषेत उत्तर द्यायला हवे. तसेच सरकारनेदेखील सैन्याला स्वातंत्र्य द्यावे.
- अनिल बाम, मेजर जनरल (सेवानिवृत्त)
सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ‘स्ट्राईक’
पुलवामा येथे भ्याड हल्ला करून भारतीय जवानांचा बळी घेणारे दहशतवादी व त्यांना प्रोत्साहन देणाºया पाकिस्तानला योग्य प्रत्युत्तर देणे आवश्यकच होते. २०१६ साली भारताने केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’ पाकिस्तानने नाकारला होता. मात्र यंदा त्यांनीच याला दुजोरा दिला आहे. सामरिकदृष्ट्या हा अतिशय महत्त्वाचा ‘स्ट्राईक’ आहे. यातून भारतीय वायुसेनेची क्षमतादेखील सिद्ध झाली आहे. ‘मिराज’ विमानांची ‘नेव्हिगेशन’ प्रणाली सर्वोत्तम आहे. बालाकोट तसेच परिसरातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता येथे कारवाई करणे आव्हानात्मकच होते. वायुदलाने केलेली कामगिरी कौतुकास पात्र आहे. मात्र यानंतर पाकिस्तान काही तरी करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. त्यामुळे सर्व पातळ््यांवर आपण सावध राहिले पाहिजे.
-अभय पटवर्धन, कर्नल (सेवानिवृत्त)