भारतीय उड्ड्यण क्षेत्र ‘टॉप’३ मध्ये येणार

By admin | Published: October 17, 2015 03:32 AM2015-10-17T03:32:52+5:302015-10-17T03:32:52+5:30

गेल्या अनेक वर्षांत भारतीय उड्ड्यण क्षेत्राने अनेक चढउतार अनुभवले आहेत. परंतु भारतीय बाजारामध्ये प्रचंड क्षमता आहे. आज जगभरात भारतीय उड्ड्यण क्षेत्राचा पाचवा क्रमांक लागतो.

In the Indian aviation area 'Top' 3 will come | भारतीय उड्ड्यण क्षेत्र ‘टॉप’३ मध्ये येणार

भारतीय उड्ड्यण क्षेत्र ‘टॉप’३ मध्ये येणार

Next

दिनेश केसकर : नागपुरातील ‘एमआरओ’चे जागतिक स्तरावर ‘मार्केटिंग’ व्हावे
नागपूर : गेल्या अनेक वर्षांत भारतीय उड्ड्यण क्षेत्राने अनेक चढउतार अनुभवले आहेत. परंतु भारतीय बाजारामध्ये प्रचंड क्षमता आहे. आज जगभरात भारतीय उड्ड्यण क्षेत्राचा पाचवा क्रमांक लागतो.
परंतु येत्या २० वर्षात देशाचा समावेश ‘टॉप’ ३ देशांमध्ये असेल असा विश्वास ‘बोईंग इंटरनॅशनल’चे उपाध्यक्ष डॉ.दिनेश केसकर यांनी व्यक्त केला. ‘व्हीएनआयटी’मध्ये (विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) आयोजित ‘अ‍ॅक्सिस’ या तांत्रिक महोत्सवाच्या उद्घाटनसाठी मुख्य अतिथी म्हणून ते आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
मागणी-पुरवठ्याचे संतुलित प्रमाण व इंधनाचे जागतिक बाजारात घटलेले दर यामुळे भारताच्या नागरी उड्ड्यण क्षेत्राला बऱ्यापैकी स्थैर्य आले आहे. पुढील २० वर्षांत भारताला १ हजार ७४० विमानांची गरज भासणार आहे असे ते म्हणाले. उपराजधानीतील ‘एमआरओ’संदर्भातदेखील त्यांनी भाष्य केले. ‘एअर इंडिया’सोबत झालेल्या करारानुसार ‘बोईंग’ने जागतिक दर्जाचा ‘एमआरओ’ उभारला.
परंतु ‘बोईंग’चे मुख्य काम विमानांचे ‘मेन्टेनन्स’ करणे नव्हे तर त्यांना तयार करणे हे आहे. त्यामुळे करारानुसार ‘एमआरओ’ एअर इंडियाकडे हस्तांतरित करण्यात आला. तसेही ‘एमआरओ’चे संचालन करणे हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरले नसते असे त्यांनी स्पष्ट केले. केवळ देशातील उड्ड्यण क्षेत्रावर जर ‘एमआरओ’ अवलंबून राहिला तर त्याचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. या ‘एमआरओ’मध्ये कुशल मनुष्यबळाची संख्या वाढवून जगभरात याचे योग्य पद्धतीने ‘मार्केटिंग’ झाले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.(प्रतिनिधी)


‘मिहान’मध्ये कंपन्या येणे आवश्यक
नागपूरला ‘मिहान’च्या माध्यमातून विकासाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. येथे जास्तीत जास्त प्रमाणात नामांकित कंपन्या येणे आवश्यक आहे. ‘बोईंग’ला येथे ‘एमआरओ’ स्थापन करताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला. तसे होऊ नये व जास्तीत जास्त कंपन्या याव्या यादृष्टीने उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत डॉ.केसकर यांनी व्यक्त केले.

‘आॅनलाईन’ अभ्यासक्रम सुरू व्हावेत
भारतातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. प्राध्यापकांसोबतच ‘गुगल’ त्यांचा गुरू झाला आहे. उद्योग क्षेत्र व बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन अभ्यासक्रमांमध्येदेखील त्या अनुषंगाने बदल करणे आवश्यक आहे. यादृष्टीने धोरण आखले पाहिजे. शिवाय जगातील नामांकित विद्यापीठांप्रमाणे ‘आॅनलाईन’ अभ्यासक्रमांवरदेखील भर देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.केसकर यांनी प्रतिपादन केले.

नील आर्मस्ट्रॉंग ठरले प्रेरणास्थान
चंद्रावर सर्वात अगोदर पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्रॉंग हे डॉ.दिनेश केसकर यांचे ‘पीएचडी’चे मार्गदर्शक होते. १९६९ साली ज्या दिवशी त्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले त्यावेळी मी अमरावतीला रेडिओवरून वृत्तांकन ऐकले होते व तेव्हापासूनच त्यांना भेटण्याची सुप्त इच्छा मनात होती. नागपुरातून अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांच्यासोबतच काम करण्याची संधी मिळाली. आर्मस्ट्रॉंग हे अतिशय शांत व तितकेच हुशार व्यक्ती होते. त्यांनी कधीही पुस्तकातून शिकविले नाही. चंद्रावर पाऊल ठेवणारा प्रथम मनुष्य म्हणून त्यांची निवड झाली नव्हती हेदेखील मला त्यांच्याकडूनच कळले होते असे डॉ.केसकर यांनी सांगितले.

Web Title: In the Indian aviation area 'Top' 3 will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.