भारतीय सिनेमात हवे ’डायव्हर्सिटी व रिप्रेझेंटेशन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:31 PM2018-02-19T23:31:22+5:302018-02-19T23:35:46+5:30
जातीभेद हा भारतीय समाजात आजही आहे. सिनेमातही तो अपवाद सोडला तर आहेच. त्यामुळेच भारतीय सिनेमा आजही ग्लोबल होऊ शकलेला नाही. म्हणून भारतीय सिनेमाला खऱ्या अर्थाने ग्लोबल व्हायचे असेल तर सिनेमांमध्ये विविधता (डायव्हर्सिटी) व प्रतिनिधित्व (रिप्रेझेंटेशन) आवश्यक आहे, असे मत ‘बॅटल आॅफ भीमा कोरेगाव’ या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जातीभेद हा भारतीय समाजात आजही आहे. सिनेमातही तो अपवाद सोडला तर आहेच. त्यामुळेच भारतीय सिनेमा आजही ग्लोबल होऊ शकलेला नाही. म्हणून भारतीय सिनेमाला खऱ्या अर्थाने ग्लोबल व्हायचे असेल तर सिनेमांमध्ये विविधता (डायव्हर्सिटी) व प्रतिनिधित्व (रिप्रेझेंटेशन) आवश्यक आहे, असे मत ‘बॅटल आॅफ भीमा कोरेगाव’ या डॉक्युमेंट्रीचे दिग्दर्शक सोमनाथ वाघमारे यांनी येथे व्यक्त केले.
दीक्षाभूमी येथे बुद्ध महोत्सवांतर्गत सुरू असलेल्या चित्रपट महोत्सवात सोमवारी विनादे कांबळे यांची ‘पोस्टमार्टम’ आणि ‘द बॅटल आॅफ भीमा कोरेगाव’ही सोमनाथ वाघमारे यांनी तयार केलेली डॉक्युमेंट्री फिल्म दाखवण्यात आली. यानंतर वाघमारे व कांबळे यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरेही दिली. यावेळी फिल्म फेस्टिव्हलचे संयोजक अजय ढोके प्रामुख्याने उपस्थित होते.
सोमनाथ वाघमारे म्हणाले, भारतीय सिनेमांमध्ये दलित, बहुजनांचे विषय केवळ असहाय्य, दया या भानेतून दाखविले जातात. त्यांची शूरता, त्यांचे साहस, नेतृत्व म्हणजेच मुख्य हिरो, मुख्य कथा या स्वरूपात ती दाखवली जात नाही. कारण चित्रपट तयार करणारी मंडळी कोण हे महत्त्वाचे आहे. अपवादात्मक आता नागनाथ मंजुळेसारखे आंबेडकरी विचारांतून आलेले दिग्दर्शक ही उणीव भरून काढत आहेत. बहुजन आंबेडकरी लोकांमध्ये गुणवत्ता आहे, त्यांना संधी मिळाली तर काय होऊ शकते, हे नागनाथ मंजुळे यांनी दाखवून दिले आहे. तेव्हा चित्रपटाच्या क्षेत्रात आंबेडकरी बौद्ध व बहुजन समाजातूनही युवकांनी यावे आणि चांगली कलाकृती साकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.
पुढील डॉक्युमेंट्री ‘गेल आॅमवेंट’ यांच्या जीवनावर
सध्या ‘गेल आॅमवेंट’ यांच्या जीवनावर डॉक्युमेंट्री तयार करीत आहे. विदेशातून भारतात आलेल्या गेल यांनी आपले संपूर्ण जीवन आंबेडकरी विचाराला वाहून घेतले आहे. त्यांच्या जीवनावरील डॉक्युमेंट्री ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
आज श्याम बेनेगल यांचा ‘मंथन’
बुद्ध महोत्सवातील चित्रपट महोत्सवाचा समारोप मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी होईल. यावेळी श्याम बेनेगल दिग्दर्शित मंथन हा चित्रपट दुपारी ३ वाजता दाखवण्यात येईल. यानंतर सायंकाळी ५.१५ वाजता जीजस इन कश्मीर, सायंकाळी ६.३० वाजता ‘माँक व्हिथ अ कॅमेरा’ आणि अनमिस्टेक चाईल्ड हे चित्रपट दाखविण्यात येतील.