देशातील माध्यमे शक्तिशाली, ध्रुवीकरणाला जागा नाहीच! ‘लोकमत मीडिया नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2023 10:42 AM2023-04-05T10:42:41+5:302023-04-05T10:44:49+5:30

‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का?’ विषयावर रंगला परिसंवाद

Indian media is powerful there is no room for polarization Dignitaries says at 'Lokmat Media National Conclave' | देशातील माध्यमे शक्तिशाली, ध्रुवीकरणाला जागा नाहीच! ‘लोकमत मीडिया नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये मान्यवरांचा सूर

देशातील माध्यमे शक्तिशाली, ध्रुवीकरणाला जागा नाहीच! ‘लोकमत मीडिया नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये मान्यवरांचा सूर

googlenewsNext

Lokmat National Media Conclave | लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आपल्या देशातील माध्यमांचे ध्रुवीकरण झाले आहे, अशी अनेक जण चर्चा करतात. मात्र यातील अनेक जण हे विदेशी माध्यमांचे प्रतिनिधी असतात व त्यांच्या देशातील नकारात्मक बाबी सोडून ते भारताचे पाय खेचण्याचाच जणू प्रयत्न करतात. मात्र भारतीय माध्यमांमध्ये जगातील नॅरेटिव्ह स्थापित करण्याची क्षमता आहे. देशातील माध्यमे शक्तिशाली असून त्यात ध्रुवीकरणाला अजिबात जागा नाही. भविष्यात निश्चितच भारतातील माध्यमे जगाला आपली शक्ती दाखवून देतील, असा विश्वास ‘लोकमत’च्या मंचावरून देशातील माध्यमक्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांची जन्मशताब्दी तसेच लोकमत नागपूरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त रविवारी नागपुरात  ‘लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांची उपस्थिती या कॉन्क्लेव्हचे खास वैशिष्ट्य राहिली. याचे उद्घाटन राज्याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा अध्यक्षस्थानी होते. देशपातळीवरील मान्यवर अभ्यासू पत्रकारांनी ‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का?’ या विषयावर आपली भूमिका मांडली.

‘लोकमत’च्या ५० वर्षांच्या वाटचालीचा इतिहास मांडणाऱ्या, ख्यातनाम चित्रकार एम. नारायण यांनी साकारलेल्या देखण्या चित्रकृतीचे अनावरण केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते लोकमत भवनात करण्यात आले. ९ बाय १९ फूट आकारात ‘लोकमत’चा प्रवास चित्रित करण्यात आला असून ही चित्रकृती लोकमतचे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा यांना अर्पण करण्यात आली आहे. याप्रसंगी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, समूह संपादक विजय बाविस्कर, उपाध्यक्ष नीलेश सिंग, नागपूर लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, लोकमत समाचारचे वरिष्ठ संपादक विकास मिश्र, लोकमत टाइम्सचे संपादक एन. के. नायक आदी उपस्थित होते. यावेळी अनुराग सिंह ठाकूर यांनी लोकमतच्या चित्रकृतीचे अवलोकन करीत कौतुक केले. तसेच लोकमत चौकात लागलेल्या स्टॅच्यू ऑफ फ्रीडम ऑफ प्रेसचेही अवलोकन केले.

भाजप अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पाठीशी- अनुराग सिंह ठाकूर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री

अगोदर देशात वर्तमानपत्रांचा बोलबाला होता. मात्र आता माध्यमांचे स्वरूप बदलले आहे.  भाजपने नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने भूमिका घेतली असून भविष्यातदेखील आम्ही याच्या पाठीशी राहू. काही विदेशी माध्यमे विविध प्रश्न उपस्थित करत असतात. मात्र प्रत्यक्षात कोणावरही नियंत्रण आणण्याचा केंद्र सरकारचा उद्देश नाही. भारतातील माध्यमे स्वतंत्र होती व ती तशीच स्वतंत्र राहतील. माध्यमांनीही जबाबदारीचे पालन करण्याची गरज आहे. कुणाच्या हातचे बाहुले होत दुष्प्रचार करण्याऐवजी बातमीची सत्यता पडताळून पाहण्यावर भर दिला पाहिजे. जगभरातील विचार व ‘नॅरेटिव्ह’ स्थापित करण्याची भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये क्षमता आहे. त्यासाठी केवळ ‘ब्रेकिंग न्यूज’ची पत्रकारिता न करता सत्यावर आधारित पत्रकारितेवर भर दिला 
पाहिजे.

---------------------------------------------------

पत्रकारांनी सत्तेसोबत नव्हे, सत्यासोबत असावे- सुधीर मुनगंटीवार वन, सांस्कृतिक कार्य मंत्री

एखाद्या पदवीप्राप्त डॉक्टरने रुग्णावर उपचार करताना जर चुकीची औषधे दिली तर त्याचे वाईट परिणाम एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर होतात. परंतु पत्रकाराने दिलेल्या एक चुकीच्या बातमीचा संपूर्ण समाजावर विपरीत परिणाम होतो. सामाजिक सलोख्याचा विचार करता पत्रकारितेमध्ये हे भान राखणे महत्त्वाचे आहे. पत्रकारिता करताना दूषित दृष्टीचे परिणाम सत्याची बाजू मांडायला अडसर ठरतात. विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे जाण्याच्या वाटचालीत माध्यमांची भूमिका ही सकारात्मक व राष्ट्राच्या हिताची असायला हवी. माध्यमांचे ध्रुवीकरण कदापि शक्य नाही. ध्रुवीकरण ही काहींची वैयक्तिक मते आहेत. त्याचे कारण माध्यमे सगळ्या गोष्टी राजकारणाच्या चौकटीतून पाहतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पत्रकारांनी सत्तेसोबत नाही, तर सत्यासोबत असावे.

---------------------------------------------------

म्हणूनच मतभेदाचे इकाे-चेंबर तयार झाले- स्मिता प्रकाश, संपादक (वृत्त), एशियन न्यूज इंटरनॅशनल

साेशल मीडिया प्रश्न विचारण्याचे माध्यम बनले खरे, पण त्याने एक माेठा धाेका निर्माण केला. समाजमाध्यमे मतभेदांचे इकाे-चेंबर बनली आहेत. यात प्रत्येक जण आपले विचार मांडतो व दुसऱ्याच्या विचारांवर दबाव निर्माण करताे. हेच माध्यम सरकारबाबत चांगले बाेलणाऱ्या मुख्य प्रवाहातील माध्यमांना ‘गाेदी मीडिया’, ‘मंकी मीडिया’ असे संबाेधते. मात्र, त्यामुळे विचलित हाेण्याची गरज नाही. विराेधी स्वर जाणून घेणे हे चांगल्या पत्रकारितेचे लक्षण आहे. उजवे-डावे चर्चा हाेत असताना अँकरने समंजसपणे मध्यममार्गी भूमिका मांडली तरी त्याला आराेपांचा सामना करावा लागताे. पक्षपाती ठरविले जाते. पत्रकारांनी यामुळे विचलित हाेऊ नये. साेशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्यांना घाबरलो तर संपून जाऊ. म्हणून माध्यमांनी मध्यमार्गी भूमिका साेडू नये.

---------------------------------------------------

माध्यमात समाजातील विचाराचेच प्रतिबिंब- नाविका कुमार, समूह संपादक, टाइम्स नेटवर्क

माध्यमे समाजाचेच प्रतिबिंब असतात. परंतु, सध्या माध्यमांना दाेषी धरण्याचे सत्र सुरू आहे. पण, म्हणून अधिक चिंता करण्याची गरज नाही. माध्यमे एकाच पक्षाला महत्त्व देतात असा आराेप हाेताे, पण विराेधी पक्ष सहकार्य करीत नसतील तर त्यांची भूमिका कशी मांडता येईल. लाेकशाही धाेक्यात असल्याचा आरोपदेखील कांगावाच आहे. सरकार किंवा माध्यमांना असहिष्णू म्हणणाऱ्या विराेधी पक्षांची असहिष्णुता कुणी विचारात घेत नाही. देशात लाेकशाही जिवंत आहे आणि माध्यमे पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. महत्त्वाचा मुद्दा असा, की ७००-८०० वृत्तवाहिन्या आहेत. त्यापैकी अनेकजणांचे उद्योग वेगळे असतात व त्यासाठी चॅनेलचा वापर करतात. तेव्हा माध्यम संस्थांना परवाने देण्यावर नियंत्रण यायला हवे.

---------------------------------------------------

हे तर माेबाईल पाेलरायझेशन- अमिश देवगण, व्यवस्थापकीय संपादक, न्यूज १८ (हिंदी)

आज सशक्त लाेकशाही व मजबूत सरकार आहे. पक्षपाताचे आराेप माध्यमांवर नेहमीच होत आले आहेत. समाज ताेच आहे; पण यात इंटरनेट, माेबाईलची भर पडली आहे. हे ध्रुवीकरण माध्यमांचे नव्हे तर माेबाईलने निर्माण केलेले आहे. आम्ही पश्चिम बंगाल, बिहारमध्ये झालेली हिंसा दाखवायची नाही का? सत्य दाेन्ही डाेळ्यांनी पाहावे लागते. ते कडवे असते आणि ते ऐकण्याची सवय विराेधकांना नाही. आम्हाला साेशल मीडियावर शिवीगाळ झेलावी लागते; पण आम्ही सत्य दाखवणे थांबविणार नाही. लाेकांना जे आवडते तेच वेगवेगळ्या ॲंगलने दाखविण्याचा आमचा प्रयत्न असताे. त्यातूनच टीआरपी मिळतो. लाेकांकडे रिमाेट आहे. नको तसेल तर ते खाडकन चॅनेल बदलवू शकतात.

---------------------------------------------------

भारताची छबी खराब करण्याचा प्रयत्न- विकास भदाेरिया, राष्ट्रीय संपादक, एबीपी न्यूज

लाेकमतसारख्या एखाद्या माध्यम संस्थेने सरकारच्या कामाच्या बातम्या छापल्या, तरी असा गैरसमज निर्माण केला जाईल की, ते सरकारची तळी उचलतात. कारण त्यांच्यावर सरकारचा दबाव आहे. त्यासाठी साेशल मीडिया वापरला जाईल. या पर्सेप्शनचा फायदा घेण्याचा एक वर्ग प्रयत्न करतो. तो अशा गाेष्टींना हवा देत असताे. खरं तर भारत अतिशय वेगाने प्रगती करीत असून, ब्रिटेनला मागे टाकून पाचवी अर्थव्यवस्था झाली आहे. काही महासत्तांना भारताची ही प्रगती नकाे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची छबी खराब करण्याचे प्रयत्न हेात असून, मीडिया सत्य लपवीत आहे, असा प्रचार करीत येथील माध्यमांचीही प्रतिमा मलिन करण्यात येत आहे. लाेक भारतात व्यापार, उद्याेग करायला येऊ नयेत, गुंतवणूक येऊ नये, असा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जात आहे.

---------------------------------------------------

व्हाॅट्सॲप युनिव्हर्सिटीने  माध्यमांचे मोठे नुकसान- आशुताेष पाटील, संपादक, न्यूज १८ लाेकमत

वृत्तवाहिन्यांनासुद्धा ‘प्राॅफिट मेकिंग’चा विचार करावा लागताे. हा टीआरपीचा खेळ आहे. टीआरपीच्या अभ्यासानुसार वाहिन्या चालविल्या जातात. लाेकांना आवडते तेच दाखवावे लागते. साेशल मीडियाचा प्रभाव प्रचंड वाढला आहे. व्हाॅट्सॲप युनिव्हर्सिटीने माध्यमांचे नुकसान केले आहे. सुशांतसिंह राजपूतच्या प्रकरणात माध्यमांवर चाललेली मीडिया ट्रायल हा त्याचाच अनुभव आहे. अनेक गाेष्टी व्हाॅट्सॲपवर व्हायरल व्हायच्या आणि नंतर माध्यमांवर यायच्या. ‘लाेकमत’प्रमाणे जबाबदारीने पत्रकारिता करणे गरजेचे आहे. ते हाेत नाही म्हणून आराेप होतात. राजकीय पक्षांचे चॅनेल्स आहेत आणि त्यावरील निवेदकाला त्या पक्षाची बाजू घ्यावी लागते. त्यानुसार चर्चा होतात. या स्थितीत थोडे ध्रुवीकरण झाले असले तरी अनेक चांगले लाेक या क्षेत्रात आहेत, हे महत्त्वाचे.

---------------------------------------------------

त्यांनी आणीबाणीचा काळ आठवून पाहावा- अकू श्रीवास्तव, कार्यकारी संपादक, पंजाब केसरी व नवोदया टाइम्स

माध्यमे सरकारधार्जिणे झाले आहेत, असे आराेप करणारे आपल्या  स्वार्थासाठी देशाची लाेकशाहीच धाेक्यात आली, असे म्हणायला मागेपुढे पाहत नाहीत. अशांनी आणीबाणीचा काळ आठवावा किंवा अभ्यासून घ्यावा. त्या काळात विराेधाचा स्वर दाबला गेला. माध्यमांच्या कार्यालयात पीआयबीचे अधिकारी बसून असायचे व विराेधात लिहिले तर वर्तमानपत्र छापणे बंद करायचे. आज तर परखडपणे विराेधात बाेलले जाते. काही मीडिया हाउस सरकारविराेधात बेधडक लिहितात. तेव्हा ते लिहू शकले हाेते का, हाही विचार करावा. आम्ही पत्रकारितेचा तो काळ पाहिलाय, ज्यामध्ये महिनाभरातील ३० पैकी २५ दिवस केवळ पंतप्रधानांचेच भाषण असायचे आणि उरलेल्या इतर बातम्या असायच्या. त्यावेळी माध्यमांची विविधता नव्हती. आज वर्तमानपत्र, टीव्ही, साेशल मीडियासुद्धा प्रभावी झाला आहे.

---------------------------------------------------

ध्रुवीकरण आधी होते, आताही आहे- प्रदीप मैत्र, सहयोगी संपादक, हिंदुस्थान टाइम्स

माध्यमांचे ध्रुवीकरण नवीन बाब नाही. धृवीकरण आधी होते, आताही आहे. माध्यमे नेहमीच कोणाची ना कोणाची बाजू घेत असतात. देशात आणीबाणी लागू झाली, त्यावेळी त्या निर्णयाचे स्वागत करणारी माध्यमेही देशात होती, परंतु माध्यमांना कोणीतरी ताब्यात घेतल्याचा आरोप चुकीचा आहे. माध्यमे स्वतंत्र होती व आजही स्वतंत्र आहेत. माध्यमांमध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. आधी सोशल मीडिया नव्हता. प्रसार वेगात होत नव्हता. आता सोशल मीडियामुळे कोणतीही गोष्ट झपाट्याने जगाच्या कोनाकोपऱ्यात पोहोचते. नंतर, ती गोष्ट पारंपरिक माध्यमांमध्ये येते.

---------------------------------------------------

ध्रुवीकरण नाही, पण प्रभाव कमी झाला- राहुल पांडे, राज्य माहिती आयुक्त, नागपूर व छत्रपती संभाजीनगर

समाज कीर्तनाने सुधारला व तमाशाने बिघडला, असे म्हणता येत नाही. समाजाची स्वत:ची विशिष्ट भूमिका असते. भारतीय समाजामध्ये विविधता आहे. त्यांच्या विचारांमध्येही भिन्नता आहे. माध्यमे समाजाचा आरसा असतात. परिणामी, समाजाचे ध्रुवीकरण झाले, तेच माध्यमांत दिसते. याचा अर्थ माध्यमांचे धृवीकरण झाले, असा नाही. समाजाला माध्यमांकडून केवळ गुळगुळीत भाषेची अपेक्षा नसते. दरम्यान, विविध गटांतील लोक माध्यमांवर काही आरोप करीत असतील, तर तो माध्यमांच्या पारदर्शकतेचा पुरावा ठरतो. आज देश विकास करीत आहे. त्यामुळे माध्यमांची भूमिका सकारात्मक असली पाहिजे. अनेकदा विकास रोखण्यासाठी अडथळे निर्माण केले जातात. त्याचे समर्थन करण्याऐवजी त्यामागे कोण आहे, त्यांचा उद्देश काय आहे, याचा शोध माध्यमांनी घेतला पाहिजे. माध्यमे प्रश्न विचारतात, म्हणून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे दुर्दैवी बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे देश नव्हे. देश आधी होता व पुढेही राहील. सध्या माध्यमांचे धृवीकरण झाले, असे वाटत नाही, परंतु माध्यमांचा समाजावरील प्रभाव कमी झाला, हे नक्की.

---------------------------------------------------

असहमतीचे स्वर ऐकले तर ध्रुवीकरण नाही-  एस. एन. विनाेद, ज्येष्ठ पत्रकार व लाेकमत समाचारचे माजी संपादक

देशात माध्यमांचे ध्रुवीकरण झाले, असे म्हणता येईल; पण ते सकारात्मक विचाराने घ्यावे लागेल. गेल्या काही वर्षांत भारत प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगती करीत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला लक्ष्य केले जात आहे आणि दुर्दैवाने देशातील एक वर्ग या कटाचा भाग हाेत आहे. सत्ता पक्ष असहमतीचे स्वर ऐकत नसल्यानेच ही गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कुणी दाेष दाखविले तर स्वत:ला सुधारण्यासाठी ते ऐकून घ्यायला हवे. असहमतीचे स्वर ऐकून सरकारने सत्य समाेर मांडावे व पूर्वग्रह दूर करावा. आज माध्यमांचे प्रतिनिधी दाेन गटांत विभागले आहेत, हे खराेखर चांगले नाही. कारण पत्रकारिता साधा पेशा नाही, तर पवित्र पेशा आहे आणि समाज व राष्ट्रहित जाेपासणारे कर्तव्य आहे.

---------------------------------------------------

माध्यमांचे संतुलन बिघडले आहे- सरिता कौशिक, उप-कार्यकारी संपादक, एबीपी माझा

राजकीय बातम्या हा माध्यमांसाठी महत्त्वाचा विषय आहे. त्या बातम्या देताना माध्यमे कधी उजवी, कधी डावी, तर कधी केंद्रीय भूमिका ठेवतात. गेल्या काही वर्षांत माध्यमांवर उजव्या विचारांचा प्रभाव वाढला आहे. कधी-कधी डाव्या विचारांचे दर्शनही घडते, परंतु केंद्रीय भूमिका कमकुवत झाली आहे. हे चित्र पुढेही असेच कायम राहील, असे ठामपणे सांगू शकत नाही, परंतु यामुळे माध्यमांचे संतुलन बिघडले आहे. असे असले, तरी माध्यमांवर धृवीकरणाचा आरोप करणे चुकीचे आहे. माध्यमे समाजात घडलेल्या घटनांची माहिती देतात. ते समाजाचे पोस्टमन आहेत. दरम्यान, त्यांनी कधी-कधी आपल्या अनुभवाच्या आधारावर विशिष्ट भूमिका घेतली, तर त्यात काही गैर नाही. याशिवाय सोशल मीडिया खरेच समाजाचा आरसा आहे का, यावर सध्या गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. 

Web Title: Indian media is powerful there is no room for polarization Dignitaries says at 'Lokmat Media National Conclave'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.