भारतीय संगीत ही ईश्वरीय अनुभूती; संगीता शंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:48 AM2018-11-30T11:48:13+5:302018-11-30T11:48:47+5:30
भारतीय संगीतात ईश्वरीय अनुभूती देणाऱ्या अध्यात्मावर आधारलेले आहे. ते निव्वळ मनोरंजन नाही तर आत्म्याशी जोडण्याची शक्ती त्यात आहे. म्हणून ते काल होते, आज आहे आणि पुढेही तेवढ्याच शुद्धतेत राहील, अशी भावना प्रसिद्ध व्हायोलिनवादक संगीता शंकर यांनी व्यक्त केली.
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधुनिक काळाच्या संगीतात भारतीय परंपरेचे अभिजात संगीत लोप पावत असल्याची भीती बाळगणे चुकीचे आहे. आधीच्या काळातही शास्त्रीय संगीत सर्वांना समजत होतेच असे नाही. अभिजात संगीताचा विशिष्ट वर्ग नेहमीच राहिला आहे आणि तो आजही आहे. भारतीय संगीतात ईश्वरीय अनुभूती देणाऱ्या अध्यात्मावर आधारलेले आहे. ते निव्वळ मनोरंजन नाही तर आत्म्याशी जोडण्याची शक्ती त्यात आहे. म्हणून ते काल होते, आज आहे आणि पुढेही तेवढ्याच शुद्धतेत राहील, अशी भावना प्रसिद्ध व्हायोलिनवादक संगीता शंकर यांनी व्यक्त केली.
कालिदास महोत्सवात सादरीकरणासाठी आलेल्या संगीता शंकर यांनी लोकमतशी संवाद साधला. आई एन. राजम यांच्याकडून संगीता यांना मिळालेला व्हायोलिन वादनाचा वारसा त्यांच्या मुली रागिणी आणि नंदिनी यांच्यातही उतरला आहे. संगीताचा हा कुटुंबीय वारसा बालपणापासून आपसुकच त्यांच्याकडे आला आणि त्यांच्याकडून मुलींकडेही गेला. त्या या तीन पिढ्यांच्या मध्यबिंदू आहेत.
विशेष म्हणजे काही कार्यक्रमात या तिन्ही पिढ्यांनी सुमधूर व्हायोलिनचे संमोहक सादरीकणही केले आहे. त्यांच्या मते, हा दबाव नसतो. ही आमच्या कुटुंबाला ईश्वराकडून मिळालेली देणगी आहे. ही साधना एका पिढीकडून दुसºया पिढीकडे जात असते. तुमच्याकडे असलेली लक्ष्मी (धनसंपदा) निघून जाईल, मात्र सरस्वती पिढ्यान्पिढ्या वाहत असते. ही विद्या रसिकांच्या आनंदासाठी द्यायची आहे, एवढेच मला माहिती असल्याची त्यांची भावना. उत्साद बिस्मिल्ला खान, विलायत खान अशा महान कलावंतांचे आशीर्वाद या कलेतून मिळाले. आठ वर्षाची असताना एका टीव्ही कार्यक्रमात उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबत वादनाची संधी मिळाली आणि १३ वर्षाची असताना ते प्रेक्षकांमध्ये असताना त्यांच्यासमोरच कला सादर करण्याचा सुखद प्रसंग त्यांनी वर्णन केला. अनेक कटु आठवणीही आहेत, पण आयुष्यात चांगले स्वीकारत जाणे, हेच जगणे आहे, ही भावना त्यांनी व्यक्त केली. इतक्या वर्षांच्या प्रवासात जाणकारांसह शास्त्रीय संगीताची जाण नसलेल्या श्रोत्यांकडूनही भरपूर प्रेम आणि आदर मिळाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा व उत्तमोत्तम संगीतकार घडावेत, यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुरेश भट सभागृहाची भव्यता देखणी
नागपूरशी लहानपणापासून नाते जुळले आहे. सुरेश भट सभागृहाची भव्यता पाहून डोळे दीपल्याचे त्या म्हणाल्या. १३ वर्षाची असताना आईसोबत येथे मैफिलच्या कार्यक्रमात पहिल्यांदा वादन केले होते. त्यानंतर अनेकदा कार्यक्रम होत राहिले. येथील श्रोत्यांना शास्त्रीय संगीताची समज आहे व नेहमी भरभरून पे्रम मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आणि सीएचे करिअर सोडले
आई संगीता शंकर यांच्यासोबत नंदिनी यांनीही सादरीकरण केले. व्हायोलिन वादनात एक उदयोन्मुख कलावंत म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यावेळी त्यांच्याशीही गप्पा मारण्याची संधी मिळाली. घरी संगीताचे वातावरण असल्याने ३-४ वर्षाची असताना आपसुकच ते माझ्याकडेही आले. त्यातच आवडही निर्माण झाली. आठ वर्षाची असताना दीदी (रागिणी शंकर) व १३ व्या वर्षी एकल सादरीकरणाची संधी मिळाली आणि हा प्रवास उत्तरोत्तर वाढत गेला. यादरम्यान त्यांनी सीएची परीक्षाही उत्तीर्ण केली. काही वर्षे कामही केले. मात्र संगीत कार्यक्रम वाढत असल्याने जॉब करण्यात अडचण येऊ लागली. त्यामुळे काही तरी एक निवडण्याचा निर्णय घ्यावा लागला. मी माझ्या पिढीकडून मिळालेले संगीत निवडल्याचे मनोगत नंदिनी यांनी व्यक्त केले. हेच माझा आनंद आणि हेच प्रेम असल्याचे त्या म्हणाल्या.