जागतिक बाजारात भारतीय रुईला दुय्यम स्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 03:18 PM2021-02-08T15:18:47+5:302021-02-08T15:22:20+5:30
Nagpur News भारतीय कापूस व रुई उच्च दर्जाची असली तरी जागतिक बाजारात भारतीय रुईला दुय्यम स्थान आहे. या रुईच्या गाठींना दरवर्षी जागतिक बाजारात इतर देशांच्या तुलनेत १२ ते १६ टक्के कमी दर मिळतो.
सुनील चरपे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय कापूस व रुई उच्च दर्जाची असली तरी जागतिक बाजारात भारतीय रुईला दुय्यम स्थान आहे. या रुईच्या गाठींना दरवर्षी जागतिक बाजारात इतर देशांच्या तुलनेत १२ ते १६ टक्के कमी दर मिळतो. याला भारतातील कापूस जिनिंग व प्रेसिंग प्रक्रियेतील स्वच्छतेचा (कंटेमिनेशन) अभाव कारणीभूत आहे, अशी माहिती रुई निर्यातदारांनी व जिनिंग-प्रेसिंग मालकांनी दिली.
शेतकऱ्यांना कापसाचे वर्गीकरण करणे शक्य नसले तरी ते जिनिंग-प्रेसिंग मालकांना सहज करता येते. व्यापारी व जिनिंग-प्रेसिंग मालकांनी कापूस खरेदी करतेवेळी चांगल्या प्रतीचा कापूस वेगळा ठेवून त्याचे वेगळे जिनिंग व प्रेसिंग केल्यास तसेच रुई 'कंटेमिनेशन मशीन'द्वारे स्वच्छ करून त्याच्या गाठी तयार केल्यास रुईची गुणवत्ता कायम राखली जाते. वेगवेगळ्या लांबीच्या धाग्याच्या (स्टेपल लेंथ) गाठी (रुई) तयार होतात. त्या रुईला चांगला भाव मिळतो. मात्र, बहुतांश व्यापारी व जिनिंग-प्रेसिंग मालक सरसकट कापसाचे जिनिंग व प्रेसिंग करीत असल्याने रुईची व त्यापासून तयार होणाऱ्या कापडाची गुणवत्ता खालावते, अशी माहिती प्रकाश व्हाइट गोल्ड जिनिंग प्रेसिंगचे मालक ओम डालिया यांनी दिली.
भारतीय रुई चांगल्या दजार्ची असूनही ह्यकंटेमिनेशन फ्रीह्ण नसल्याने त्याला जागतिक बाजारात कमी दर मिळतो. उलट, इतर देशांमधील साधारण दजार्ची रुई 'कंटेमिनेशन फ्री' असल्याने त्याला चांगला भाव मिळतो. देशांतर्गत बाजारात प्रत्येक दर्जाच्या रुईला खरेदीदार असल्याने तसेच नफा कमावण्याच्या नादात व्यापारी व जिनिंग-प्रेसिंग मालक रुईच्या गुणवत्तेला महत्त्व देत नाही. या बाबीमुळे जागतिक बाजारात भारतीय रुई बदनाम झाली असल्याचे रत्नाकर टेक्सटाइल इंडस्ट्रीजचे मालक सुभाष आकोळे यांनी सांगितले. या प्रकारामुळे बांग्लादेश, व्हीएतनाम व छोट्या देशातच भारतीय रुई मागणी आहे, अशी माहिती प्रकाश डालिया यांनी दिली.
कापडाची गुणवत्ता खालावते
रुई 'कंटेमिनेशन फ्री' नसल्यास त्यात कापसासोबत कचरा व अन्य बाबींचे तंतू मिसळतात. ते प्रेसिंग करतेवेळी कापसाच्या तंतूसोबत एकजीव होतात. याच तंतूपासून सूत व सुतापासून कापड तयार केले तर त्या कापडाला रंग देतेवेळी कापसाचे तंतू रंग स्वीकारतात. इतर बाबींचे तंतू रंग स्वीकारत नसल्याने त्या कापडाची गुणवत्ता खालावते. वस्त्रोद्योग मंत्रालय, सीसीआय, देशभरातील जिनिंग-प्रेसिंग मालकांनी कापूस खरेदीपासून जिनिंग व प्रेसिंगपर्यंत विशिष्ट प्रकारची काळजी घेतल्यास भारतीय रुईला जागतिक बाजारात अव्वल स्थान निर्माण करता येऊ शकते. यातून कापडाची गुणवत्ता कायम राखता येते, असा विश्वासही तज्ज्ञांनी व्यक्त केला.
वस्त्रोद्योग मंत्रालयाचे अनुदान
जिनिंग-प्रेसिंगला वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून जिल्हा उद्योग केंद्रामार्फत (डीआयसी) अनुदान दिले जाते. ते अनुदान जिनिंग प्रेसिंगमधील मशीन व तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी वापरावयाचे असते. परंतु, या अनुदानाचा वापर मूळ बाबींसाठी केला जात आहे. 'कंटेमिनेशन रिमूव्ह्य सिस्टीम' लावण्यासाठी केल्यास ही समस्या सुटू शकते.
कापसाचे जिनिंग व प्रेसिंग करतेवेळी त्याचे वेचानिहाय वर्गीकरण केल्यास धाग्याच्या लांबीनुसार रुईच्या गाठी तयार करता येते. जिनिंग करतेवेळी व प्रेसिंग करण्यापूर्वी रुईचे 'कंटेमिनेशन' केले तर चांगल्या दर्जार्चे कापड तयार करता येऊ शकते. भारतात कापूस मजुरांकरवी वेचला जातो. त्यात कचऱ्याचे प्रमाण कमी असले तरी गुणवत्ता कायम राखण्यासाठी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
- ओम डालिया, मालक,
प्रकाश व्हाइट गोल्ड जिनिंग प्रेसिंग, हिंगणघाट