गोरेवाड्यातील ‘इंडियन सफारी’ दिवाळीपर्यंत खुली होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 09:52 AM2020-07-03T09:52:32+5:302020-07-03T09:52:51+5:30
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्रािणसंग्रहालयात ‘इंडियन सफारी’अंतर्गत ‘एन्ट्रन्स प्लाझा’, अस्वल सफारी व बिबट सफारीचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही सफारींमध्ये वन्यप्राणी स्थलांतरित करण्याची पूर्वतयारी सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील ‘इंडियन सफारी’चे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. प्राणिसंग्रहालयात वन्यप्राण्यांचे स्थानांतर करून दिवाळीपर्यंत ही सफारी पर्यटकांसाठी खुली करण्याच्या दिशेने नियोजन करण्यात येईल, असे वनमंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी वनविकास महामंडळाला सूचना दिल्या आहेत. वनविकास महामंडळाच्या सभागृहात गुरुवारी गोरेवाडा प्रकल्पाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्रािणसंग्रहालयात ‘इंडियन सफारी’अंतर्गत ‘एन्ट्रन्स प्लाझा’, अस्वल सफारी व बिबट सफारीचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही सफारींमध्ये वन्यप्राणी स्थलांतरित करण्याची पूर्वतयारी सुरू आहे. तसेच वाघ व तृणभक्षी प्राण्यांच्या सफारीचे काम प्रगतिपथावर आहे. ही कामे मागील वर्षी नोव्हेंबरमध्येच पूर्ण होणे अपेक्षित होती. परंतु सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे ‘इंडियन सफारी’तील टायगर सफारी व ‘हर्बिवोरस सफारी’ची कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. ‘एन्ट्रन्स प्लाझा’, अस्वल सफारी व बिबट सफारी लवकरच वनविकास महामंडळाकडे हस्तातंरित करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.